18 January 2019

News Flash

पारसिक बोगदा गळतीमुक्त होणार!

मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण जलद मार्गावरील दिव्याजवळच १.३ किलोमीटर अंतराचा पारसिक बोगदा आहे.

येत्या १५ दिवसांत दुरुस्तीच्या कामांना सुरुवात

मध्य रेल्वे मार्गावरील सर्वात जुना बोगदा असलेल्या आणि अतिक्रमणामुळे धोकादायक ठरलेल्या पारसिक बोगद्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या बोगद्यातून होणारी पाण्याची गळती आणि त्यामुळे बोगद्याला निर्माण झालेला धोका पाहता त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामाला जून महिन्याच्या अखेरीस सुरुवात केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.

मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण जलद मार्गावरील दिव्याजवळच १.३ किलोमीटर अंतराचा पारसिक बोगदा आहे. हा बोगदा १८७३ मध्ये पारसिक हिलमध्ये बांधण्यात आला. बोगद्यात दुहेरी मार्गिका टाकून ठाणे ते कल्याण आणि त्यामार्गे जाणाऱ्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी मार्गिका उपलब्ध करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील अंतर बरेच कमी झाले. मात्र, वर्षांनुवर्षे या बोगद्याच्या डागडुजीकडे लक्ष न देण्यात आल्याने तो धोकादायक बनू लागला आहे. बोगद्याच्या वरच्या भागातून वर्षभर या बोगद्यात पाणी पडते. या बोगद्यात २४ हजार व्होल्टेज उच्च दाबाच्या ओव्हरहेड तारांसह अन्य विद्युत उपकरणोही आहेत. त्यामुळे या ठिकाणी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. याखेरीज बोगद्यावरून पडणाऱ्या पाण्यामुळे त्याची मातीही भुसभुशीत होत आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी वेगमर्यादाही आखून देण्यात आली आहे. परिणामी गाडय़ांचे वेळापत्रकही बिघडते. शिवाय सुरक्षिततेचा मुद्दाही निर्माण होतो. हे पाहता पारसिक बोगद्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

या बोगद्याच्या स्थितीविषयी अहवाल तयार करण्याचे काम सेन्ट्रल मायनिंग रिसर्च इन्स्टिटय़ूटला देण्यात आले. इन्स्टिटय़ूटने दिलेल्या अहवालात बोगद्यात होणारी गळती रोखणे गरजेचे असून त्यासाठी दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. या अहवालानंतर रेल्वेकडून बोगद्याची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी आधुनिक यंत्रणेद्वारे हे काम केले जाणार असून जून महिन्याच्या अखेरीस कामाला सुरुवात होईल. हे काम मध्यरात्री लोकल गाडय़ा बंद होताच केले जाणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली.

दुरुस्तीची योजना

  • पारसिक बोगद्याच्या वरील ज्या भागातून पाणी झिरपते तिथपर्यंत ड्रील मशीनने खोल खड्डे केले जातील आणि त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञान वापरून केमिकल तसेच अन्य उपकरणांच्या मदतीने तो भाग पूर्णपणे बंद केला जाणार आहे.
  • डोंगरावरील पाणी खाली येण्यासाठी त्याला अन्य मार्गही उपलब्ध करून दिला जाणार आहे.
  • हे काम करताना बरीच सुरक्षितता बाळगावी लागणार आहे. त्यासाठीच लोकल सेवा बंद झाल्यानंतर हे काम केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

First Published on June 14, 2018 1:59 am

Web Title: parsik tunnel leakage issue