विविध योजनांसाठी निधीवाटप करताना सरकारकडून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप करीत विरोधकांनी मंगळवारी विधानसभेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले. मात्र त्यानंतरही विरोधक अडून बसल्यामुळे गोंधळातच दिवसभराचे कामकाज उरकण्यात आले.
 विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आशीष जैस्वाल यांनी निधीवाटपात विरोधी सदस्यांना डावलले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी कामकाज रोखले.
ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास विभागाच्या विविध योजनांच्या निधीवाटपात पक्षपात केला जात असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना निधीचे समान वाटप केले जाते. मात्र विरोधी आमदारांना डावलले जात असल्याचा आरोप खडसे यांनी केला. दुष्काळी विभागातील १५ तालुक्यांना प्रत्येकी १० कोटी रुपये देतानाही पश्चिम महाराष्ट्रात त्यातही मंत्री आणि आमदारांचे चहरे पाहून निधीचे वाटप करण्यात आले आहे. कराच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या निधीवर सर्वाचा समान हक्क असून किमान विद्यमान मुख्यमंत्र्याच्या काळात तरी या निधीचे समान वाटप होईल अशी अपेक्षा होती. मात्र तीही फोल ठरत असल्याची टीका खडसे यांनी केली.
याबाबत खुलासा करताना निधीवाटपात कोणताही भेदभाव केला नसल्याचा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
दुष्काळी भागात सिमेंटचे बंधारे बांधण्याबाबत १५ तालुक्यांना प्रत्येकी १० कोटी रुपये देताना मंत्र्याचा चेहरा पाहून नव्हे तर भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसारच  देण्यात आल्याचे ते म्हणाले. मात्र त्यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही.