मंकी हिल ते कर्जतदरम्यानची कामे, वेगमर्यादेमुळे निर्णय

मुंबई ते पुणे मार्गावरील मंकी हिल ते कर्जतदरम्यान तिसऱ्या मार्गिकेवरील काही किरकोळ कामे आणि वेगमर्यादेमुळे पॅसेंजर गाडय़ा १५ जानेवारीपर्यंत रद्द केल्या आहेत. यामध्ये सीएसएमटी ते पंढरपूर ते सीएसएमटी, पनवेल ते पुणे ते पनवेल यासह अन्य पॅसेंजर गाडय़ांचा समावेश आहे. कोयना एक्स्प्रेस पुण्याहून सुटणार आहे.

पावसाळ्यात बोरघाटातील मंकी हिल ते कर्जतदरम्यान रुळांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या दरम्यान असलेल्या तिसऱ्या मार्गिकेवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करतानाच अन्य मार्गावरून वळवण्यात आली होती. पुलाचा विस्तार यासह काही महत्त्वाची कामे पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या मार्गिकेवरील रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र काही किरकोळ कामे अद्यापही बाकी आहेत. या कामांसाठी मंकी हिल ते कर्जतदरम्यान एक्स्प्रेस-पॅसेंजर गाडय़ांसाठी प्रतितास २० किलोमीटरची वेगमर्यादाही आखली आहे. वेगमर्यादेमुळे अन्य एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकावरही परिणाम होत आहे. त्यामुळे शिल्लक कामे पूर्ण करतानाच वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी पॅसेंजर गाडय़ा १५ जानेवारीपर्यंत रद्दच करण्याचा निर्णय घेतला आहे.

रद्द केलेल्या गाडय़ा

पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर गाडी १५ जानेवारी २०२० पर्यंत रद्द केली आहे. तर ट्रेन ५०१२७ सीएसएमटी-पंढरपूर पॅसेंजर गाडी २ ते ४ जानेवारी आणि ९ ते ११ जानेवारीपर्यंत, ट्रेन ५१०२८ पंढरपूर-सीएसएमटी ३ जानेवारी ते ५ जानेवारी आणि १० ते १२ जानेवारीपर्यंत, याशिवाय सीएसएमटी ते बिजापूर १ जानेवारी, ५ ते ८ जानेवारी आणि १२ ते १५ जानेवारी, ट्रेन ५१०३० बिजापूर ते सीएसएमटी पॅसेंजर १ व २ जानेवारी, ६ ते ९ जानेवारी, १३ ते १५ जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. १५ जानेवारीपर्यंत भुसावळ ते पुणे ते भुसावळ एक्स्प्रेस मनमाड-दौंडमार्गे वळवण्यात आली असून सीएसएमटी ते कोल्हापूर ते सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंत धावेल आणि पुण्यातून सुटणार आहे.