वांद्रे-डेहराडून एक्स्प्रेसने रात्री उशिरा डहाणू स्थानक सोडले. डहाणू-घोलवडदरम्यान निर्जन परिसर आहे. याचदरम्यान गाडीच्या एस-२ या डब्यात जोरदार आवाज होऊन आगीचे लोट उसळले. रात्री पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे डब्याची खिडक्या-दारे प्रवाशांनी बंद केली होती. आगीमुळे रसायनांचा उर्ग दर्प आणि धूर एस-३ व एस-४ मध्ये पसरला. मोठा आवाज आणि विचित्र वासामुळे गाडीतील इतर प्रवाशांना काहीतरी अघटीत घडल्याची चाहूल लागल्याची माहिती याच गाडीच्या एस-४ डब्यातून प्रवास करणारे मेहुल उपाध्याय यांनी दिली.
ऐन उत्तररात्री आणि निर्मनुष्य ठिकाणी ही आग लागल्याने मदतीची कुमक मिळण्यास विलंब लागला. जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या सांताक्रूझ येथील पाच तरुणांनी जीव धोक्यात घालून पेटत्या डब्यात अडकलेले प्रवासी आणि जखमींना बाहेर काढले. प्रवासी आणि गाडीतील कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक सिलिंडर्सच्या मदतीने आगीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
पालघरहून रेल्वे पोलीस डहाणूला पोहोचले, परंतु तेथून घोलवड येथील घटनास्थळी त्यांना चालत जावे लागले. त्यामुळे दीड तासानंतर त्यांची मदत पोहोचली.
अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणून मृतदेह डहाणू महाविद्यालयात हलविले. आगीच्या भक्ष्यस्थळी गेलेले डबे काढून गाडी डेहराडूनकडे रवाना करण्यात आली. कोकण पोलीस महानिरीक्षक आयुक्त सुखविंदरसिंग यांनी घटनास्थळास भेट दिली. तसेच ठाणे ग्रामीण पोलीसचे अधिक्षक अनिल कुंभारे यांनी तात्काळ मदतीचे आदेश दिले.  

प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह
डेहराडून एक्स्प्रेसच्या आगीमुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता आणि सुरक्षित प्रवास याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे येथे यार्डात उभ्या असलेल्या एका उपनगरीय गाडीच्या डब्याला आग लागली होती. सुदैवाने गाडीत कोणीही प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना आणि जीवितहानी टळली होती.