जनजीवन सुरळीत; पोलिसांचे संचलन

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबई शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा जागोजागी असलेला पहारा, पोलिसांनी लागू केलेली जमावबंदी, समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह छायाचित्र व संदेश पाठवण्यास केलेली मनाई या नियोजनामुळे शहरात शांतता कायम राहिली. न्यायालयाच्या निकालानंतर सर्व समुदायांतील नागरिकांनी शांतता बाळगल्याने कोणताही अनूचित प्रकार घडला नाही.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर व उपनगरांत शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच पोलीस त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले होते. शहरातील धार्मिकदृष्टय़ा संवेदनशील भागासह मंदिर आणि मस्जिद यांच्या बाहेर मोठा फौज-फाटा तैनात होता. शहरातील विविध भागांत पोलिसांनी संचलन करत नागरिकांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले होते. कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी यंत्रणांकडून प्रयत्न केले जात असतानाच सामान्य जनजीवन मात्र सुरळीतपणे सुरू होते. वांद्रे येथील बेहराम पाडा, माहीम परिसर, भेंडी बाजार आदी ठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत चालू असल्याचे दिसत होते. या भागांतील सर्व दुकाने उघडलेली होती.

पूर्व उपनगरांतील अनेक भागांतही पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासूनच कडक बंदोबस्त लावला होता. पूर्व उपनगरांतील गोवंडी-शिवाजी नगर, ट्रॉम्बे, मानखुर्द, घाटकोपरचा काही भाग, चेंबूर आणि कुर्ला अशा संवेदनशील ठिकाणी पोलिसांच्या काही विशेष तुकडय़ा तैनात करण्यात आल्या होत्या.

मात्र इतर दिवसांच्या तुलनेत शनिवारी पूर्व उपनगरांतील सर्वच रस्त्यांवर तुरळक वाहनांची ये-जा पाहायला मिळत होती. इतर दिवशी ज्या रस्त्यावर वाहतूक कोंडी असते, ते रस्ते शनिवारी पूर्णपणे रिकामे पाहायला मिळाले. त्याचबरोबर रेल्वे स्थानकांवरही इतर दिवशींच्या तुलनेत रेल्वे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. रेल्वे स्थानकात प्रवेश करणाऱ्या नागरिकांच्या सामानाची तपासणी केली जात होती.

निकाल काय येणार याची सर्व समाजांतील बांधवांना उत्सुकता होती. त्यामुळे दिवसभर बसस्थानक, रेल्वेस्थानक, लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी मोबाइलवरून निकालाची माहिती घेत असल्याचे दिसत होते.

समाजमाध्यमांतून कोणीही आक्षेपार्ह गोष्टी पोस्ट करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून व्हॉट्सअप ग्रुपच्या अ‍ॅडमिनने त्यानुसार बदल करत इतरांना आक्षेपार्ह मजकूर टाकता येणार नाही, याची तजवीज केली होती. पोलिसांनी मुंबईतील संवेदनशील भागावर विशेष लक्ष ठेवले होते. तेथे पोलिसांच्या विशेष तुकडय़ा तैनात केल्या होत्या. त्याचबरोबर विविध समुदायातील प्रमुख नेत्यांनीही शांतता राखण्याचे आवाहन केले होते.