लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे बारा महिने टंचाईचा सामना करावा लागणाऱ्या कल्याण-डोंबिवलीकरांना आता थेट उल्हास नदीतून पाणी उचलण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विस्तारीत बारवी प्रकल्पात कल्याण-डोंबिवलीकरांसाठीही पाणी राखून ठेवावे, अशी मागणीसुद्धा या वेळी करण्यात आली. बारवी पाणी वाटपाबाबत १८ जून रोजी एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात हा निर्णय घेण्यात येणार आहे.     
आमदार संजय दत्त यांनी गेल्या अधिवेशनात कल्याण-डोंबिवलीच्या पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला होता. त्या वेळी यासंदर्भात संबंधितांची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या दालनात मंगळवारी झालेल्या बैठकीत महापालिकेला मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्रातून थेट पाणी उचलण्याची परवानगी देण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रासाठी सध्या प्रतिदिन ३०० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठय़ाची आवश्यकता आहे. मात्र सध्या प्रत्यक्षात केवळ २३८ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठय़ातील ही तूट बारवीतून भरून निघावी, असा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. सध्या महापालिका एमआयडीसीकडून प्रतिदिन ११७ दशलक्ष लिटर्स पाणी विकत घेते. मात्र आता मोहिली येथे महापालिकेचा जलशुद्धीकरण प्रकल्प असल्याने त्याऐवजी थेट नदीतून पाणी उचलावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पालकमंत्री गणेश नाईक, खासदार आनंद परांजपे, आमदार संजय दत्त, निरंजन डावखरे, आयुक्त रामनाथ सोनावणे, नगरसेवक विश्वनाथ राणे आदी याप्रसंगी उपस्थित होते.