मुसळधार पावसाने वसई विरारची कशी दाणादाण उडाली हे आपल्याला ठाऊक आहेच. कायम वेळेत पोहचणारी पश्चिम रेल्वेही या धुवाँधार पावसामुळे रखडली, ठप्प झाली. आता वसई विरारमध्ये पावसानंतरचे काही परिणाम बघायला मिळत आहेत. वीज गायब झाल्याने अनेक प्रवाशांनी मोबाइल चार्ज करण्यासाठी वसई आणि विरार या दोन्ही स्थानकांमधील सीसीटीव्ही कॅमेरा कनेक्शन काढल्याचे समजते आहे. Mumbai Train Updates या फेसबुक ग्रुपचे अॅडमिन मंदार अभ्यंकर यांनी हे फोटो पोस्ट करत वसई विरार स्थानकांवर नेमके काय सुरु आहे हे यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. वसई आणि विरारच्या बहुतांश भागात चार ते पाच दिवस वीज नसल्याने आता मोबाइल चार्ज करण्यासाठी प्रवाशांनी आणि वसई विरारकरांनी स्टेशनवरचे सीसीटीव्ही कनेक्शन काढले आहे.

वसई विरार भागात तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली. या दोन्ही उपनगरांमध्ये सर्वाधिक पाणी साठले होते. वसईतील १०० फूट रोड, सन सिटी, साईनगर, पंडित दिनदयाळ नगर, अश्विन नगर या भागात पाणी साठलेलेच होते. याच समस्येमुळे दोन्हीकडची वीज गायब आहे. वीज गायब झाल्याने लोकांचे हाल होत आहेत तरीही वसई विरार महापालिकेने काहीही लक्ष दिले नाही अशी तक्रार नागरिकांनी केली. पावसाचे साठलेले पाणी काढण्यासाठी महापालिकेने पंपांची व्यवस्था करायला हवी. आवश्यक त्या उपाय योजना करायला हव्यात असे वसईकरांनी म्हटले आहे.