केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण दरवर्षीप्रमाणेच घसघशीत असले तरी ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण यंदा घटल्याचे दिसत आहे. बारावीप्रमाणेच दहावीसाठीही यंदा गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही.

सीबीएसईचा दहावीचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा काही अंशाने वाढला असून देशाचा एकूण निकाल ९१.४६ टक्के आहे. गेल्यावर्षी निकालाची टक्केवारी ९१.१० होती. निकाल काहीसा वाढला असला तरी ९० ते ९५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जवळपास ३ टक्क्य़ांनी तर ९५ टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण एका टक्क्य़ाने घटल्याचे दिसत आहे. यंदाही मुली सरस ठरल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.३१ टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.१४ टक्के आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७८.९५ टक्के आहे.

यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक विषयांची परीक्षा रद्द करण्याची वेळ मंडळावर आली. प्रामुख्याने दिल्ली आणि उत्तरेकडील काही राज्यांमध्ये परीक्षेवर अधिक परिणाम झाला. त्यामुळे रद्द झालेल्या विषयांसाठी विद्यार्थ्यांना सरासरीच्या आधारे गुण देण्यात आले आहेत. सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर गुणवत्ता यादी जाहीर न करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्याचप्रमाणे यंदापासून गुणपत्रिकेवरील अनुत्तीर्ण या शेऱ्याऐवजी फेरपरीक्षेस पात्र असा शेरा देण्यास मंडळाने सुरूवात केली आहे.

त्रिवेंद्रम केंद्राचा सर्वाधिक निकाल

महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल ९८.०५ टक्के लागला आहे. यंदा प्रथमच पुणे विभागातून परीक्षा घेण्यात आली. यापूर्वी महाराष्ट्राचा समावेश चेन्नई विभागात होता. देशपातळीवर दहा विभागांमध्ये परीक्षा घेण्यात येत असे. यंदापासून दहाऐवजी सर्व राज्यांची सोळा विभागांत विभागणी करण्यात आली. पुणे विभागात महाराष्ट्रसह गोवा, दीव-दमण, सिल्वासा यांचा समावेश आहे. देशात सर्वोत्तम (९९.२८ टक्के) निकाल नव्यानेच स्थापन झालेल्या त्रिवेंद्रम विभागाचा आहे.