मनसे, समाजवादी पार्टीचे नगरसेवक आणि माजी विरोधी पक्षनेत्यांच्या अनुपस्थितीमुळे मुंबई महापालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार यशोधर फणसे ८ मतांनी विजयी झाले. तर शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची माळ विनोद शेलार यांच्या गळ्यात पडली.
दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी झाली. स्थायीमधील २७ पैकी २२ सदस्य उपस्थित होते. फणसे यांच्या पारडय़ात युतीचे १३, अ.भा. सेना आणि अपक्ष अशी दोन मिळून १५ मते पडली. तर मनसेचे संदीप देशपांडे, दिलीप लांडे, भालचंद्र आंबुरे, सपाचे रईस शेख आणि माजी सभागृह नेते ज्ञानराज निकम यांच्या अनुपस्थितीमुळे काँग्रसचे उमेदवार भोमसिंह राठोड यांना केवळ सात मतांवर समाधान मानावे लागले.
शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी सात मताधिक्याने युतीचे उमेदवार विनोद शेलार विजयी झाले. या निवडणुकीत मनसेचे तीन, एक अपक्ष सदस्य अनुपस्थित होता, तर सपाच्या नगरसेविका नरजहाँ रफिक या तटस्थ राहिल्या. विनोद शेलार यांना १४, तर राष्ट्रवादीच्या प्रियतमा सावंत यांना सात मते पडली.