यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी या गावात मोठय़ा प्रमाणात कुमारी मातांचे झपाटय़ाने वाढत चालेले प्रमाण आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या अन्य समस्यांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. न्यायालयानेही या समस्येला आळा घालण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी काय पावले उचलली जात आहे, याबाबत उत्तर दाखल करण्याचे आदेश मंगळवारी राज्य सरकारला दिले.
पुण्याची नॅचरल रिसोर्सेस कन्झ्व्‍‌र्हेशन सोसायटी, आदिवासी समाज कृती समिती आणि रवींद्र तळपे अशा तिघांनी अ‍ॅड्. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत जनहित याचिका केली आहे. न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. रेवती डेरे यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने सरकारला या प्रकरणी उत्तर दाखल करण्याचे आदेश देत सुनावणी १२ जानेवारी रोजी ठेवली आहे. यवतमाळ जिह्यातील झरी जामनी या गावात मोठय़ा प्रमाणात कुमारी मातांचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच या प्रकारामुळे कुपोषणाची आणि गंभीर आजार फैलावण्याची समस्याही झपाटय़ाने वाढत आहे.