करोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाडयांच्या स्थानकात फलाट तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), दादर, कल्याण, ठाणे आणि पनवेल स्थानकांवर फलाट तिकीट देण्यात येणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

गेल्यावर्षी करोनाची साथ पसरल्यानंतर रेल्वेने फलाट तिकीट विक्री बंद केली होती. मधल्या काळात पुन्हा फलाट तिकीट देण्यास सुरवात केली होती. सध्या शहरात सर्वत्र करोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यातच प्रवाशांना गाडीत बसविण्यासाठी कुटुंबियही स्थानकात गर्दी करतात. त्यातून फलाटावर गर्दी होण्याचा धोका असतो. त्यामुळे स्थानकावर सामाजिक अंतर पाळले जावे, तसेच गर्दी होऊ नये यासाठी फलाट तिकीट विक्री बंद केल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.