मुंबई महापालिका आयुक्तांचे आदेश

मुंबई : फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला झालेला अक्षम्य उशीर लक्षात घेऊन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांना फटकारत १५ हजार अधिकृत फेरीवाल्यांना येत्या महिन्याभरात जागा वितरित कराव्यात असे निर्देश दिले आहेत. या मुदतीत जागा वितरित झाल्या नाहीत तर अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

पालिकेने पाच वर्षांपूर्वी फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली होती. त्यावेळी केलेल्या सर्वेक्षणातील केवळ १५ हजार १२० फेरीवालेच अधिकृत ठरले आहेत. संपूर्ण मुंबईत पालिकेने बसण्याच्या ८५ हजार जागाही निश्चित केल्या आहेत. मात्र तरीही अद्याप अधिकृत फेरीवाल्यांना त्यांच्या जागा वितरित करण्याचे काम करण्यात आलेले नाही. या फेरीवाल्यांची माहिती संकलित करण्याचे काम सध्या पालिकेतर्फे सुरू असून त्यानंतर त्यांना त्यांच्या हक्काच्या जागांवर बसवण्यात येणार आहे. मात्र नुकत्याच झालेल्या केंद्रीय शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत या प्रक्रियेला झालेल्या विलंबाबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. तसेच महिन्याभरात या जागा वितरित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच फेब्रुवारीची मुदत पाळता न आल्यास अधिकाऱ्यांचे वेतन कपात किंवा बढती रोखण्याची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

’ २०१४ साली फेरीवाल्यांचे पालिकेतर्फे सर्वेक्षण.

’ एकूण सव्वा लाख अर्जाचे वितरण.

’ ९९,४३५ फेरीवाल्यांकडून अर्ज सादर.

’ ५१,७८५  फेरीवाल्यांकडून कागदपत्रे जमा.

’ १५,१२० फेरीवाले छाननीअंती पात्र

’ १३६६ रस्त्यांवर फेरीवाला क्षेत्र

’ ८५,८९१ फेरीवाल्यांसाठी बसण्याच्या जागा.