मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अशिक्षित, अडाणी अशा शब्दांचा वापर करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे. मात्र, निरूपम आपल्या विधानावर ठाम आहेत आणि आपल्या विधानात काहीही चुकीचं नसल्याचं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे. आपण लोकशाहीत राहतो आणि लोकशाहीत पंतप्रधान हा देव नसतो. लोकशाहीत पंतप्रधानांवर टीका ही होत असतेच, मर्यादेत राहून टीका करण्यात काहीच चुकीचं नाही. मी वापरलेले शब्द असभ्य नव्हते, मी माझ्या विधानावर ठाम आहे असं निरुपम म्हणाले.


भाजपावाले गरजेपेक्षा जास्त संवेदनशील झाले आहेत. प्रत्येक विधानावर त्यांचा आक्षेप असतो. पहिली गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि आपण लोकशाहीत राहतो. लोकशाहीमध्ये पंतप्रधानांवर टीका ही होत असतेच, मर्यादेत राहून टीका करण्यात काहीच चुकीचं नाही. मी वापरलेले शब्द अजिबात चुकीचे नव्हते. मी माझ्या विधानावर ठाम आहे, असं निरूपम म्हणाले. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी मोदींच्या पदवीचा मुद्दा उचलला आणि दिल्ली युनिव्हर्सिटीवर कोणाचा दबाव आहे ज्यामुळे , पंतप्रधान मोदींची पदवी जाहीर केली जात नाही असा सवाल उपस्थित केला.

काय म्हणाले होते निरूपम –
पंतप्रधान मोदींवर काढण्यात आलेला चित्रपट मुलांना दाखवण्याचा प्रयत्न केला जात असून हे अत्यंत चुकीचे आहे. मुलांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे, असे मत व्यक्त करताना निरूपम यांनी जी मुलं शाळा, महाविद्यालयात शिकत आहेत. त्यांना मोदींसारख्या अशिक्षित, अडाणी व्यक्तीबाबत जाणून घेऊन काय मिळणार आहे ? ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे की आजही आमच्या देशातील नागरिक आणि मुलांना आमच्या पंतप्रधानांकडे कोणती पदवी आहे याचीच माहीत नाही, असे वक्तव्य संजय निरूपम यांनी केले होते.