भारताने पाकिस्तानचा प्रश्न कायम निकाली काढावा, काश्मीर प्रश्न कायमचा सोडवावा राम मंदिराप्रमाणे हे प्रश्न पुढच्या निवडणुकांपर्यंत शिल्लक ठेवू नका असे आवाहन आता शिवसेनेने केले आहे. पाकव्याप्त काश्मीरवर तरी तिरंगा फडकवाच असेही शिवसेनेने सुचवले आहे. तशीच रणनीती, युद्धनीती आखल्याशिवाय पंतप्रधान मोदी मागे हटणार नाहीत याबाबत जनतेच्या मनात विश्वास आहे, आता त्यांनी मागे हटू नये असेही शिवसेनेने म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखातून ही मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पाक तुरंगात खितपत असलेल्या कुलभूषण जाधव यांना सोडवण्याची देखील हीच वेळ आहे. शांततेची हीच किंमत आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात?
हिंदुस्थान आणि पाकिस्तानात सध्या जी झटापट सुरू आहे त्यास युद्ध म्हणावे की आणखी काही म्हणावे? दोन देशांत युद्धासारखी परिस्थिती नक्कीच निर्माण झाली आहे. आमच्या हवाई दलाने थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. त्यानंतर पाकची विमाने आमच्या हद्दीत घुसली. त्यातले एक ‘एफ-16’ विमान आमच्या जवानांनी टिपले व पाडले. याचा आनंद आहेच, पण त्याच वेळी आमचे एक ‘मिग’ विमान पाकिस्तानने पाडले व पायलट विंग कमांडर अभिनंदन पाक लष्कराच्या तावडीत सापडले. युद्धात हे घडणारच. सैनिकाचे आयुष्य हे असेच असते. म्हणूनच सारा देश जवानांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी नेहमीच उभा राहतो. पाकिस्तानला हादरा देणारी जोरदार कारवाई हिंदुस्थानी सैन्याने केली व त्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा करावा लागेल.

पाक तुरुंगात खितपत असलेल्या कुलभूषण जाधव यांना सोडवण्याचीदेखील हीच वेळ आहे. शांततेची हीच किंमत आहे. इम्रान खान यांना शांतता हवी, पण त्यांच्या लष्कराला आणि आयएसआयला ती हवी आहे काय? इम्रान खान यांनी शांततेची बांग द्यायची व त्याच वेळी पाकच्या लष्कराने पाठीत सुरे खुपसायचे ही त्यांची नेहमीची नीती असते. मुळात पाकिस्तानचे अर्थकारण पुरते कोसळले आहे व सैन्याचे मनोधैर्य खचले आहे. जगात त्यांच्या बाजूने जो उभा राहील तो विश्वशांतीचा दुश्मन ठरेल. म्हणून चीनसारखे राष्ट्रही या वेळी पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा द्यायला तयार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. हिंदुस्थानी सैन्य आता लढायच्या मूडमध्ये आहे व रोज रोज आपल्याच भूमीवर रक्त सांडण्यापेक्षा शत्रूला मारूनच पुढे जावे ही भावना ज्वलंत आहे. कश्मीरसह सर्व प्रश्नांचा निचरा आताच करा व कच खाऊ नका.

पाकिस्तानचा पूर्ण खात्मा होईल, फक्त ‘हुल झपाटा’ देऊन त्यांना सोडणार नाही ही भावना प्रबळ आहे. निदान पाकव्याप्त कश्मीरवर तरी नक्कीच तिरंगा फडकेल अशी रणनीती, युद्धनीती आखल्याशिवाय पंतप्रधान मोदी मागे हटणार नाहीत याबाबत जनतेच्या मनात विश्वास आहे. देशातील विरोधी पक्षाने दिल्लीत घाईघाईने बैठक बोलावून काही मुद्दे उपस्थित केले. सैनिकी कारवाईचे राजकारण करू नका, हा त्यातला प्रमुख मुद्दा आहे. पाकिस्तानचा साफ कचरा करा व कश्मीर प्रश्नाचा निचरा करा! देशाचे हे एवढेच मागणे आहे. राममंदिराप्रमाणे पुढच्या निवडणुकीपर्यंत हे प्रश्न शिल्लक ठेवू नका!