22 September 2020

News Flash

चांगल्या सुव्यवस्थेसाठी जनताभिमुख पोलीस ठाणे!

जनतेला आपल्यापर्यंत वा अन्य कुठल्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे यावे लागू नये, अशी आपली इच्छा आहे.

पोलीस आयुक्तांचा एककलमी कार्यक्रम
पोलिसांनी जनतेशी सौहार्दाने वागलेच पाहिजे. पोलीस आणि जनता यांच्या संपर्कातूनच कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चांगली राहू शकते. जनतेला आपल्यापर्यंत वा अन्य कुठल्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे यावे लागू नये, अशी आपली इच्छा आहे. जनतेला पोलीस ठाणे आपले वाटले पाहिजे. ‘जनताभिमुख पोलीस ठाणे’ यालाच आपला प्राधान्यक्रम असल्याचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
लोकांच्या तक्रारीही ऐका
या पाश्र्वभूमीवर आपण उपायुक्त पातळीवर पुढील आठवडय़ांपासून बैठका घेणार आहोत. पोलिसांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अडचणी आणि या अडचणीवर मात करीत सामान्यांशी त्यांनी कसे वागावे, याबाबत या बैठकांमध्ये जोर दिला जाणार आहे. उपायुक्त हा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्याने सकाळी ९.३० वाजता पोलीस ठाण्यात हजर राहिले पाहिजे. एक वाजेपर्यंत पोलीस ठाण्याच्या कारभारावर काही वेळ लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी दिला पाहिजे. त्यानंतर संध्याकाळी आपल्या परिक्षेत्रात फिरले पाहिजे. उपायुक्तांनी अशी पद्धत वापरल्यास वरिष्ठ निरीक्षकांवरही एक प्रकारे दबाव राहील. गुन्ह्य़ांच्या नोंदी वाढण्याची भीती वरिष्ठ निरीक्षकांनी बाळगू नये. परंतु विनाकारणही कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करू नये, अशा सूचनाही दिल्याचे पडसलगीकर यांनी सांगितले. पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीविषयी आपल्याकडे तक्रार येता कामा नये, अशी तंबीही त्यांनी दिली आहे.

पोलिसांवरील ताण कमी करणे आवश्यक
पोलीस-जनता यांच्यातील संपर्क सुधारायचे असतील तर पोलिसांवरील ताणही कमी केला पाहिजे. त्यामुळे रात्रपाळी करून गेलेल्या पोलिसाला पुन्हा कामावर बोलावू नये. बोलावलेच तर एक तासापेक्षा जास्त वेळ त्याला थांबवू नये, अशा सूचनाही दिल्याचे पडसलगीकर यांनी सांगितले. रात्रपाळी केल्यानंतरही पोलिसाला दिवसभर थांबवून ठेवण्याच्या प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पोलीस ताजातवाना असेल तरच तो सामान्यांशी सौहार्दाने बोलू शकेल, असेही ते म्हणाले.

आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी योजना
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाचे उपायुक्त असताना मुंबईतील शेरेगर या पहिल्या मोठय़ा पॉन्झी योजनेची उकल आपणच केली होती, याची आठवण करून देत पडसलगीकर म्हणाले की, आता पॉन्झी योजनांची व्याप्ती भरपूर वाढली आहे. आर्थिक गुन्हे विभागासाठी स्वतंत्र सहआयुक्त आहे. अशावेळी या योजनांची उकल करण्याबरोबच अशा योजनांमध्ये सामान्यांची फसवणूक कशी टाळता येईल, या दिशेने आपण प्रयत्नशील आहोत. केवळ जनजागरूकता करण्यापलीकडे काही करता येईल का, याचा विचार करीत असल्याचेही पडसलगीकर यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2016 1:31 am

Web Title: police commissioner datta padsalgikar interview with loksatta
Next Stories
1 मिलिंद सोमणचा ‘पिकथॉन’ शब्दाला आक्षेप; अंधांची मॅरेथॉन रद्द
2 ‘शिक्षण हक्क कायद्या’पासून भटके विमुक्त वंचितच
3 बालवैज्ञानिक स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
Just Now!
X