दोन महिन्यांपूर्वी कांदिवलीत एका व्यावसायिकाला पार्सलमधून बंदुकीची गोळी पाठवून पाच कोटींच्या खंडणीसाठी धमकावल्याचा प्रकार घडला होता. पोलिसांन या गुन्ह्याची उकल केली असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. या गुन्हयामध्ये व्यावसायिकाच्या नातेवाईकाचा सहभाग आहे. पोलिसांनी खंडणीसाठी धमकावल्या आरोपाखाली नातेवाईकाला आणि त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला अशी दोघांना अटक केली आहे.

२७ मे रोजी व्यावसायिक त्याच्या घरात असताना सोसायटीचा वॉचमन त्यांच्या नावाचे एक पार्सल घेऊन घरी आला. पार्सल उघडल्यानंतर त्यामध्ये बंदुकीची गोळी आणि एका चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीमध्ये पाच कोटीच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या व्यावसायिकाला वेगवेगळया फोन नंबरवरुन पाच कोटींच्या खंडणीसाठी धमकीचे फोन येऊ लागले. पोलिसांनी या धमकीच्या फोन कॉल्सचा तपास सुरु केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले कि, सर्वच कॉल्स रस्त्यावरच्या विक्रेत्यांच्या फोनवरुन करण्यात आले आहेत.

ज्या ठिकाणांहून हे कॉल करण्यात आले होते. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. मंगळवारी सकाळी १० वाजता या व्यावसायिकाला पुन्हा फोन आला. मुलुंडमधल्या खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याच्या मोबाइलवरुन हा फोन करण्यात आला होता. पोलिसांनी त्या विक्रेत्याला विश्वासात घेऊन फोन करणाऱ्यांची सर्व माहिती घेतली.

त्यानंतर पोलिसांनी स्थानिक मुलुंड पोलीस आणि काही नागरिकांची मदत घेऊन आरोपींना शोधून काढले. महेश भानुशाली आणि सुरेंद्र यादव अशी दोन आरोपींची नावे आहेत. दोघेही कळव्याचे रहिवाशी आहेत. भानुशाली व्यावसायिकाचा नातेवाईक असून त्याच्याकडे व्यावसायिकाचा फोन नंबर होता. भानुशाली आणि त्याचा साथीदार सुरेंद्र यादव रस्त्यावरच्या विक्रेत्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या फोनवरुन धमकीचे फोन कॉल्स करायचे. आपण कशासाठी फोन करतोय ? कोणाला फोन करतोय? हे ते विक्रेत्यापासून शिताफिने लपवायचे.