इस्थर अनुह्याचे कपडे आणि चष्मा आरोपी चंद्रभान सानप याच्या बहिणीच्या खानावळीतून शुक्रवारी पोलिसांनी जप्त केले. ज्याप्रकारे आरोपी चंद्रभान सानप याने मोटारसायकलीवरून इस्थरला नेले ते तपासून पाहण्यासाठी शुक्रवारी पोलिसांना हा घटनाक्रमाचे नाटय़मय रूपांतर करून पाहिले.
हत्येनंतर सानप इस्थरची बॅग घेऊन गेला होता. त्यातील काही कपडे चंद्रभान सानप याच्या बहिणीच्या खानावळीत दडवून ठेवलेले आढळले. त्यात इस्थरची जीन्स, टी शर्ट आणि चष्मा आदींचा समावेश आहे. हे साहित्य डीएनए तपासणीसाठी पाठवले जाणार आहे. चंद्रभानची आई आणि बहिणीला या प्रकरणात आरोपी बनवावे का याबाबत विचार सुरू असल्याचे सहपोलीस आयुक्त( गुन्हे) सदानंद दाते यांनी सांगितले.
ज्या प्रकारे सानप मोटारसायकलीवर इस्थरला घेऊन दोन अवजड बॅगांसह गेला होता ते तपासण्यासाठी शुक्रवारी पुन्हा घटनाक्रम उलगडण्यात आला. दोन हवालदार सकाळी त्याच वेळेस मोटारसायकलीवर बसले. हे दोघे घटनास्थळी २३ मिनिटांनी पोहोचले. या संपूर्ण घटनेचे चित्रिकरण करण्यात आले. आणखी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे लॅपटॉप. जेव्हा सानपने लॅपटॉप सुरू केला तेव्हा वेबकॅम सुरू होऊन त्याला स्वतचा चेहरा दिसला वा त्याने घाबरून तोफेकला, असे पोलिस म्हणाले.

‘त्याला’ फाशी द्या पण आम्हाला त्रास देऊ नका!
– चंद्रभान सानपच्या आईची विनवणी
‘इस्थर अनुह्या हत्येप्रकरणी माझ्या मुलाला फाशी द्या, पण आम्हाला त्रास देऊ नका’ असे या प्रकरणातील आरोपी चंद्रभान सानप यांची आई जिजाबाई यांचे म्हणणे आहे. जिजाबाई या कांजुरमार्ग येथील कर्वे नगर येथे राहतात. येथील रहिवाशांनीही त्यांच्याशी बोलणे टाकले असून सानप कुटुंबियांना लोकांनी वाळीत टाकले आहे. अटकेनंतर, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, पोलीस आदींनी सानप कुटुबियांचीही सतत चौकशी सुरू केली आहे.  चंद्रभानने केलेल्या या कृत्याचा आम्हाला त्रास होत आहे. त्यामुळे त्याच्या या कृत्याबद्दल त्याला फाशी द्या पण आम्हाला त्रास देऊ नका, अशी विनवणी जिजाबाई यांनी केली आहे.