अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथील एका विहिरीतून काहीतरी कुजल्याचा दुर्गंध येत असल्याचे येथील गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी विहिरीची पाहणी केली असता त्यात शिर नसलेला एक मृतदेह आढळला. त्यांनी अलिबाग पोलिसांना तात्काळ याची माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी हा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता. त्याला शिर नसल्याने प्राथमिक तपासातच ही हत्या असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. सर्वात आधी शिर नसलेला हा मृतदेह कोणाचा आहे याचा शोध घेणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सुरेश वऱ्हाडे यांनी तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक केली. यात काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला. सहाणगोटी परिसरातील सर्व गावांत जाऊन गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू झाला.

जवळच असलेल्या कुरूळ गावातून मूळचा झारखंड येथील रहिवासी असणारा राजनकुमार साव हा कित्तेक दिवस बेपत्ता असल्याचे समोर आले. तपासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा दुवा होता. कुरूळ गावात राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधला. शिर नसलेला मृतदेह हा राजनकुमारचाच आहे का हे पाहण्याची विनंती केली. मृतदेहावरील कपडय़ांमुळे त्याची ओळख पटली. त्यानंतर शवविच्छेदन आणि डीएनए तपासणीसाठी मृतदेह पाठवण्यात आला. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत धारधार शस्त्राने राजनकुमारचा खून करण्यात आल्याचे निश्चित झाले होते. तपासाचा एक टप्पा इथे पूर्ण झाला होता, तर दुसरा टप्पा सुरू होणार होता.

राजनकुमारचा मृतदेह २१ एप्रिलला सहाणगोठी येथे सापडला. पण तो ४ एप्रिलपासून बेपत्ता असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली होती. याच दिवशी त्याचा खून करून मारेकऱ्यांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असावी हे स्पष्ट झाले. राजनकुमारचा गावातील कोणाशी वाद होता का याचा तपास पोलिसांनी सुरू केला. मृतदेह आढळून आला त्या परिसरात या कालावधीत आलेले मोबाइल सीडीआर तपासण्यात आले. त्यात या हत्येचे धागेदोरे झारखंड राज्यापर्यंत पोहोचले असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी पुढील तपासासाठी पोलीस पथक झारखंडमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. तातडीने तपासपथक रवाना करण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक भिसे, साहाय्यक फौजदार शेंबडे, पोलीस नाईक रूपेश कोंडे, पोलीस काँस्टेबल पिंगळे यांचे पथक झारखंड राज्यात दाखल झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने या पथकाने वेगवेगळ्या मार्गाने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. या शोधमोहिमेनंतर रोहित मेहता या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि अलिबागला दाखल झाले. सुरुवातील रोहित काही बोलण्यास तयार नव्हता. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण केलेल्या दुष्कृत्याची कबुली दिली.

राजनकुमार साव याचे रोहित मेहता याचा मित्र राज मेहताच्या पत्नीशी अनैतिक संबध होते. याचा सुगावा रोहितला आणि राजला लागला होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. राजनकुमारला दारू पिण्याच्या बहाण्याने दोघेही सहाणगोठी येथील स्मशानभूमीजवळ घेऊन गेले. तिथे जाण्यापूर्वी दोघांनीही एक कोयता विकत घेतला होता. रात्री भरपूर दारू पाजली. यानंतर राजनकुमारला स्मशानाची भीती दाखवून घाबरवण्यास सुरुवात केली. घाबरलेला राजनकुमार उलटी करण्यासाठी खाली वाकला आणि ही संधी साधत दोघांनी कोयत्याचा घाव त्याच्या मानेवर घातला. एकाच झटक्यात शिर धडापासून वेगळे केले. हे शिर प्लास्टिकच्या पिशवीत गुंढाळून जवळच्या झाडीत नेऊन टाकले, तर मृतदेह विहिरीत ढकलून दिला.

शिर नसल्याने मृतदेह सापडला तरी त्याची ओळख पटणार नाही, अशी अपेक्षा दोघांना होती. मात्र पोलिसांनी दाखवले तपास कौशल्य आणि अधुनिक तंत्रज्ञानाची मदत यामुळे त्यांच्या काळ्या कृत्याचा उलगडा झाला. रोहितला झारखंड येथे जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतले. अलिबाग न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून राज मेहता सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गुन्ह्याच्या तपासात पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय निघोट यांच्यासह पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, उपनिरीक्षक भिसे, साहाय्यक फौजदार शेंबडे, पोलीस नाईक रुपेश कोंडे, पोलीस काँस्टेबल पिंगळे यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

अवघ्या दहा दिवसांत पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला. राज्याबाहेर जाऊन आरोपीला अटक केली.