मुद्रांक कोरे करण्यासाठी विशिष्ट तंत्र विकसित केल्याचे तपासात उघड
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या मुद्रांक घोटाळ्याची पाळेमुळे संपूर्ण राज्यात पसरली असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अंधेरी, वांद्रे, किल्ला न्यायालयात हे मागील तारखांचे मुद्रांक उपलब्ध होत असले तरी त्याचा पुरवठा राज्यातून होत असल्याचे तपासात उघड होत आहे. दरम्यान, कुठलाही क्रमांक नसलेले मुद्रांक विकण्यासाठी ते कोषागारातून लंपास करण्याबरोबरच मुद्रांकावर रसायन फवारून ते कोरे करण्याचेही तंत्र या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चोरांनी विकसित केल्याचे तपासात स्पष्ट होत आहे.
मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने शनिवारी बनावट मुद्रांक विकणाऱ्या नऊ जणांना अटक केली असून त्यात तीन वकिलांचा समावेश आहे. मागील तारखांचे मुद्रांक तयार करून ते वाट्टेल तितक्या किमतीत विकण्याच्या या घोटाळ्यात अनेक आरोपी असण्याची शक्यता गुन्हे शाखा वर्तवत आहे. मुंबईतील न्यायालयात वकील अशा प्रकारचे मुद्रांक विकत असून जुने मुद्रांक कुठून मिळत असत, याचा शोध आता मुंबई पोलीस घेत आहेत. यात भंडारा, बीड, सातारा या ठिकाणाहून जुने मुद्रांक आणण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मुंबईबाहेरून मुद्रांक आणण्यात तर येत होतेच, त्याचबरोबरीने कोषागारातूनही मुद्रांक गैरमार्गाने मिळविण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आतापर्यंत गुन्हे शाखेने हस्तगत केलेल्या मुद्रांकांमध्ये सन २००४ साली १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोषागार बंद असतानाही त्या तारखेचा शिक्का असलेले सहा मुद्रांक आहेत. यावरून, किती उघडपणे मुद्रांकातील फेरफार सुरू होते, हे लक्षात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
ज्या मुद्रांकांवर क्रमांक होते असे मुद्रांक रसायन मारून त्यावरील मजकूर नाहीसा करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न होत आहे. १० ते १०० रुपयांचे मुद्रांक तब्बल तीन ते चार हजार रुपयांना विकण्यात आल्याचेही पोलीस तपासात उघड झाले असून यात आणखी आरोपी निश्चितच असतील असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.