चोराला पकडण्यासाठी गेलेल्या एका पोलिसाचा चोराने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे मुंबईत घडली. डोंगरी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस नाईक अजय गावंड (४३) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते शरीरसौष्ठवपटू होते. त्यांना शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला होता.

फोटो गॅलरी : चोराच्या हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू 

रविवारी पहाटे पी. डिमेलो रोडवरील वाडीबंदर येथील एका दुमजली इमारतीत संतोष साळवी (३५) नावाचा चोर शिरला होता. इमारतीच्या रहिवाशांना त्याची कुणकुण लागली. रहिवाशांनी डोंगरी पोलिसांना मदतीसाठी बोलावले. त्या वेळी हा चोर इमारतीच्या गच्चीवर दडून बसला आणि आतून दरवाजा लावून घेतला. गस्तीवर असलेले बीट मार्शल तेथे पोहोचले. पण चोरटय़ाने इमारतीवरून पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बीट मार्शलांनी डोंगरी पोलीस ठाण्यात फोन करून जादा पोलीस कुमक मागवली. डोंगरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात आणि पोलीस नाईक अजय गावंड यांच्यासह तिघे तातडीने घटनास्थळी पोहोचले. या चोराने स्वत:ला गच्चीवर कोंडून घेतले होते. त्यामुळे गावंड आणि इमारतीचे एक रहिवासी हे दोघे इमारतीच्या मागील बाजूने दुसऱ्या मजल्याच्या एका खिडकीवरून गच्चीवर चढले. या दोघांनी साळवीला पोलिसांना शरण यायला सांगितले. पण तो तयार नव्हता. त्याच वेळी साळवीने एक लाकडी दांडका उचलून गावंड यांच्या डोक्यात घातला. या हल्ल्याने गावंड खाली कोसळले. त्यानंतर इमारतीमधील रहिवाशाने साळवीला पकडण्यात यश मिळवले. जखमी अवस्थेतील गावंड यांना जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अजय गावंड हे नवी मुंबईच्या जुईनगर येथील लेण्याद्री सोसायटीत राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. त्यांचा मृतदेह त्यांचे आई-वडील राहत असलेल्या मुलुंडच्या गवाणपाडा येथे नेण्यात आला. गवाणपाडा येथील स्मशानभूमीत दुपारी दोन वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पोलीस आयुक्त राकेश मारिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण) कृष्णप्रकाश, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे आणि डोंगरी पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
आरोपी साळवी हा पुण्यातील रहिवासी असून त्याला बेकायदेशीर प्रवेश, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला आणि हत्येच्या गुन्ह्य़ात अटक करण्यात आली आहे. अजय गावंड हे बलदंड शरीरयष्टीचे म्हणून परिचित होते. २००५ साली त्यांना शरीरसौष्ठव स्पर्धेत विजेता ठरल्याने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

अशीही मदत..
कर्तव्य पार पाडताना हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या गावंड यांच्या कुटुंबाचा आर्थिक आधार कायम राहावा यासाठी विशेष बाब म्हणून गावंड यांच्या ५८ व्या वर्षी निवृत्तीपर्यंत संपूर्ण वेतन दिले जाणार आहे. तसेच नंतर त्यावर आधारित कुटुंब निवृत्तिवेतन गावंड कुटुंबाला मिळेल, असे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी जाहीर केले.