राजकीय घडोमोडीवर काँग्रेस नेत्यांमध्ये खलबते :- राज्यात सध्या वेगाने राजकीय घडोमाडी घडत असून, फोडाफोडीच्या भितीने काँग्रेसने आपल्या आमदारांची  जयपूरला रवानगी केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडू मात्र त्याबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र जयपूर हे पर्यटनस्थळ आहे, त्यामुळे काही आमदार सहकुटुंब तिकडे फिरायला गेले असतील असे सांगून अप्रत्यक्ष त्याची कबुली दिली.

भाजपकडून काँग्रेसच्या काही आमदारांशी संपर्क करुन, त्यांना अमिषे दाखविली जात आहेत, असा आरोप प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला होता. भाजपने हे आरोप फेटाळले आहेत. परंतु विजय वडेट्टीवार यांनीही आमदार फोडोफेडीचा पुन्हा भाजपवर थेट आरोप केला आहे. भाजपडून ज्यांना संपर्क केला गेला, त्यापैकी काही आमदारांनी ही माहिती दिल्याचा दावाही त्यांनी केला. फोडाफोडी आणि घोडेबाजाराची भिती असल्याने काँग्रेसने आपल्या आमदारांना जयपूरला पाठविल्याचे सांगण्यात येते.

प्रमुख नेत्यांच्या दिवसभर बैठका

राज्यात अद्याप सत्ता स्थापनेचा दावा कुणी केलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी शुक्रवारी राज्यपालांकडे पदाचा राजीनामा सादर केला. पुढील व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास राज्यपालांनी त्यांना सांगितले आहे. शुक्रवारी वेगाने घडणाऱ्या राजकीय घडामोडीवर काँग्रेस नेत्यांच्या दिवसभर बैठका सुरु होत्या. सायंकाळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार आदी नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थांनी भेट घेऊन राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.