महाराष्ट्रात जे काही राजकारण घडलं आहे, मी त्याला दुर्दैवी म्हणेन. मला राजकारणाचा अर्थ हा निवडणुकीच्या पलिकडे आहे असं वाटतं. कारण, निवडणुकीच्या पलिकडे जेव्हा तुम्ही महाराष्ट्र बघता त्या महाराष्ट्राकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन हा अत्यंत कलात्मक आहे. मी जेव्हा परदेशात जातो तेव्हा तिथं पाहिलेल्या अनेक गोष्टी मला वाटतं महाराष्ट्रात आणल्या पाहिजेत. ज्या जनेतसाठी तुम्ही आहात त्यांना घरातून बाहेर पहिलं पाऊल ठेवल्यावरती समाधान वाटलं पाहिजे की, मी या राज्याचा नागरिक आहे. ते देण्यासाठी त्याच्या सभोवताली जे काही वातारवण हवं ते वातावरण निर्माण करण्याचं काम आम्हा लोकांच आहे. ते जर आम्ही चांगल्याप्रकारे करू शकलो, तर तेच मला वाटतं की राजकारण व कला यांचा संगम आहे. असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं आहे .

या वेळी राज ठाकरे म्हणाले, आता महाराष्ट्रात जे काही राजकारण घडलं आहे, मी त्याला दुर्दैवी म्हणेन. कोणीतरी कोणाबरोबर तरी निवडणुका लढवत आहे. मग निवडणुका झाल्याबरोबर जनतेनी मतदान केल्यावर मग कोणतरी कोणाबरोबर जातयं आणि कोणातरीचं भलत्याचंच सरकार बनतंय, ज्यांच्या जास्त जागा आहेत ते विरोधी पक्षात बसलेले आहेत. हे आपल्याला वरवर जरी दिसत असलं तरी त्याचा परिणाम हा खालपर्यंत होत असतो. खालपर्यंत जेव्हा परिणाम होतो, तेव्हा जे आशा लावून बसलेले असतात राजकारणाकडे किंवा निवडणुकीकडे त्यांना असं वाटतं की काही केलं तरी चालतं. हे काही महाराष्ट्राच्या दृष्टीनं चांगलं चित्र नाही. म्हणजे पुढच्या येणाऱ्या पिढ्या आपण चांगल्या घडवणार आहोत की त्यांच्यावर हा संस्कार टाकणार आहोत? असा सवाल राज ठाकरेंनी या वेळी केला. महाराष्ट्र टाइम्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मित्र यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत अनेक प्रश्नांना उत्तर दिली.

या वेळी त्यांनी आपण अपघाताने राजकारणात आल्याचं सांगितलं, ते म्हणाले, मी म्हटलं तर अपघाताने राजकारणात आलो, याचं कारण मी व्यंगचित्र करत होतो, राजकीय घराण्यात जन्म झाल्यामुळे तसे संस्कार होत होते. पण राजकारणातच जायचं असं काही ठरवलेलं नव्हतं. परंतु, जे आसपासच वातावरण होतं, जी लोकं भेटायची ती राजकारणाशी संबधित असल्याने हळूहळू तसं घडत गेलं व मी राजकारणात आलो.

निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्यांवर निशाणा साधतना राज म्हणाले,  खरंतर मला या निवडणुकीत खूप आनंद झाला होता. पण निकाल लागले तेव्हापर्यंत एकच दिवस कारण, ज्यांनी पक्षांतर केले त्या सर्वांना महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवला व घरी बसवलं. त्यातील अगदी तुरळक विजयी झाले मात्र बहुसंख्य असे आहेत की ज्यांना घरी बसवल्या गेलं.