संदीप आचार्य

मेअखेरीस करोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून पालिकेने वांद्रे-कुर्ला संकुलात १०२८ रुग्णांसाठीची व्यवस्था पूर्ण केली आहे. शुक्रवारपासून (२२ मे) या ठिकाणी बाधितांना दाखल करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय मुंबईत वेलिंग्टन क्लबसह वेगवेगळ्या ठिकाणी दहा हजार खाटांची व्यवस्था अंतिम टप्प्यात आल्याचेही सांगण्यात आले.

करोनाची लागण असलेल्या व थोडे गंभीर असलेल्या रुग्णांना वांद्रे कुर्ला संकुलात नव्याने तयार करण्यात आलेल्या रुग्णालयात शुक्रवारपासून दाखल केले जाईल. या खाटांपैकी ५० टक्के खाटांच्या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसून आली आहेत, ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, अशा रुग्णांना येथे दाखल केले जाणार असल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. गंभीर रुग्णांची व्यवस्था एशियन हार्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागात केली जाईल.

याशिवाय गोरेगाव येथील नेस्को संकुलात हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच येथे एकूण २६०० खाटांची व्यवस्था केली जाईल. वरळी आणि महालक्ष्मी येथे एक हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे अतिदक्षता विभागही तयार करण्यात आला आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे या कामांचा नियमित आढावा घेत आहेत.

वेलिंग्टन क्लब येथे ४०० खाटा तयार करण्यात येत आहेत. दहिसर ते मुलुंडदरम्यान एकूण दहा हजार खाटांची व्यवस्था आता अंतिम टप्प्यात आल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. यासाठी लागणारे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण विभागावर सोपविण्यात आली आहे.

यापूर्वी सेव्हन हिल्स येथे वर्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ५७ निवासी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता वांद्रे कुर्ला संकुलातील हजार खाटांसाठी अंबेजोगाई येथील निवासी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. साधारणपणे शंभर खाटांमागे १२ डॉक्टर व १६ परिचारिका व कंत्राटी चतुर्थ श्रेणी कर्मचारी असे मनुष्यबळ लागणार आहे. तसेच पालिकेच्या नायर, केईएम व शीव तसेच जे जे रुग्णालयातील परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील तिसऱ्या वर्षांच्या २०० हून अधिक परिचारिका उपलब्ध होतील. या परिचारिका म्हणून काम करणाऱ्यांना २० हजार रुपये मानधन दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.