केलेल्या कामातील त्रुटी दूर करण्यास कंत्राटदारांचा नकार

घोटाळेबाज कंत्राटदारांनी कामे थांबविल्याने आणि जुनाट जलवाहिन्या आणि मलनि:सारण वाहिन्यांमुळे येणाऱ्या अडचणींमुळे रस्त्याची कामे रेंगाळली असतानाच आता गेल्या पाच वर्षांत बांधलेल्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर असूनही त्यांनी याबाबत हात वर केले आहेत. विशेष म्हणजे पालिकेच्या नोटिसा व दंड यांनाही कंत्राटदार जुमानत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकीकडे नव्याने हाती घेतलेल्या रस्त्यांची कामे रखडलेली असतानाच खड्डे पडलेल्या जुन्या रस्त्यामुळेही रहिवाशांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

पावसाळ्यापूर्वी मुंबईतील रस्ते गुळगुळीत करण्याचा संकल्प महापालिकेने सोडला असला तरी घोटाळेबाज कंत्राटदारांनी कामे थांबविल्याने आणि जुनाट जलवाहिन्या आणि मलनि:सारण वाहिन्यांना खोदकामामुळे अनेक ठिकाणी गळती लागत असल्याने गेल्या दोन महिन्यांत रस्ता खोदण्याव्यतिरिक्त काहीच घडलेले नाही. त्यातच आता नवीन रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यातही कंत्राटदार दिरंगाई करत असल्याचे चित्र समोर आले आहे.

कंत्राटदाराने नव्याने रस्ता बांधल्यावर तो खराब झाल्यास दुरुस्त करण्याची जबाबदारी त्याच्यावर ठेवण्याची तरतूद डीएलपी (डिफेक्ट लायबिलिटी पीरिअड) अंतर्गत करण्यात आली आहे. डांबरी व सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी तीन वर्षे ‘डीएलपी’ आहे. या काळात रस्त्याला तडे गेल्यास, खड्डे पडल्यास रस्ता दुरुस्त करण्याची जबाबदारी व खर्च कंत्राटदाराने करायचा असतो. शहरात अनेक रस्ते अशा अवस्थेत आहेत. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी तक्रार करून, प्रशासनाने नोटिसा व दंड आकारूनही या रस्त्यांना हात लावण्यास कंत्राटदार तयार नाहीत.

आर. के. मदानी या कंत्राटदाराने ऑक्टोबर २०१४ ते मार्च २०१५ या काळात गुरुनानक शाळा ते साईविहार रस्त्याचा भाग पूर्ण केला. त्याच वर्षी पावसाळ्यात या रस्त्याचा पृष्ठभाग वाहून गेला. त्यानंतर पालिकेने कंत्राटदाराला अडीच लाख रुपयांचा दंड केला व काम पूर्ण करण्याची नोटीस पाठवली, मात्र कंत्राटदाराने काम केले नाही. यावर्षीच्या पावसात रस्ता आणखी खराब झाला. त्याबाबत पुन्हा रस्ते अभियंता, आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केला. रस्ता त्याच स्थितीत आहे, असे भांडुपमधील  नगरसेविका अनिषा माजगांवकर म्हणाल्या. हा रस्ता उतारावर असल्याने पावसामुळे त्याचा पृष्ठभाग खराब झाला. अस्फाल्टने हा रस्ता नीट राहणार नसल्याने आता मास्टिकने पृष्ठभाग केला जाईल, असे रस्ते विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.