राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रासंदर्भात काम करणाऱ्या मुंबईतल्या प्रजा फाउंडेशन मुंबईमधील आमदारांच्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे. या अहवालामध्ये घाटकोपरमधील (पश्चिम) भाजपाचे आमदार रामचंद्र कादम यांनी पाच वर्षांच्या कालावधीत विधानसभेमध्ये स्वत:च्या मतदारसंघासंदर्भात एकही प्रश्न विचारलेला नाही असं नमूद करण्यात आले आहे. या अहवालामध्ये राम कदम यांची कामगिरी इतर आमदारांच्या तुलनेत अगदीच सुमार असल्याचे म्हटले आहे. राम कदम यांना केवळ ४१.६९ टक्के गुण या अहवालात देण्यात आले आहेत.

विधानसभेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न, त्या प्रश्नांचा दर्जा, भ्रष्टाचार, विधानसभेच्या अधिवेशनातील हजेरी, लोकांसाठी उपलब्धता, गुन्हेगारी पार्श्वभूमी अशा वेगवेगळ्या स्तरावर प्रजा संस्थेने मुंबईमधील आमदारांच्या कामगिरीचे मुल्यांकन केले आहे. एकूण सात पैकी पाच क्षेत्रामध्ये राम कदम यांना लाल शेरा देण्यात आला आहे. दहावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या राम कदम यांनी विधानसभेत सर्वात कमी प्रश्न उपस्थित केले आहेत. विधानसभेतील हजेरीच्या बाबतही ते तळाला आहेत.

प्रश्न विचारण्यात मागील वर्षाप्रमाणेच या वर्षीही राम कदम ३२ पैकी ३२ व्या क्रमांकावर आहेत, हजेरीच्या बाबतीत ते २८ व्या स्थानावर आहेत. गुन्हेगारी संदर्भातील आकडेवारीमध्ये २६ व्या स्थानी आहेत. लोकांना उपलब्ध राहण्याच्या बाबतीत ते मागील वर्षीच्या तीसऱ्या क्रमांकावरुन घसरुन सहाव्या क्रमांकावर पोहचले आहेत.

मुंबईतील एकूण ३२ आमदारांपैकी केवळ भांडूप पूर्वेचे शिवसेनेचे आमदार अशोक पाटील हेच राम कदम यांच्या मागे असून एकंदरित कामागिरीमध्ये कदम हे ३२ पैकी ३१ व्या स्थानी आहेत. पाटील यांना ४०.०८ टक्के गुण असून कदम यांना ४१.६९ टक्के गुण या अहवालात देण्यात आले आहेत. पाटील हे प्रश्न विचारण्यात ३० व्या क्रमांकावर, हजेरीच्या बाबतीत १९ व्या स्थानावर लोकांना उपलब्ध राहण्याच्या बाबतीत ११ व्या स्थानी आहेत.

प्रजाने केलेल्या सर्वेक्षणामधून समोर आलेल्या अहवालामध्ये मुंबईतील भाजपा आमदारांपेक्षा शिवसेनेच्या आमदारांची कामगिरी सरस असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे पहिल्या तीन आमदारांच्या यादीत भाजपाच्या एकाही आमदाराच्या नावाचा समावेश नाही. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे हे सर्वोत्तम कामगिरी करणारे आमदार असल्याचे प्रजाने आपल्या अहवालात म्हटले आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मुंबादेवी मतदारसंघाचे काँग्रेसचे अमीन अमीर अली पटेल असून तिसऱ्या स्थानी मालाडचे आमदार अस्लम रमझान अली शेख यांचा समावेश प्रजाने आपल्या अहवालात केला आहे.