गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सवाल

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची सुस्पष्ट भूमिका घेतल्यानंतरही शिवसेनेकडून सातत्याने होत असलेली टीका आणि शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांमागे एकवटले आहेत. यापुढे शिवसेनेच्या विरोधात ‘रोखठोक’ पवित्रा घेऊन जनतेत जाण्याचा निर्णय भाजपच्या मंत्र्यांनी घेतला असून परदेशात सुट्टी उपभोगत असताना संपाला पाठिंबा कसला देता, असा सवाल करत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर नेम साधला.

उद्धव ठाकरे हे परदेशातून संपाला पाठिंबा देत आहेत, तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी  मंत्रिमंडळाच्या बैठकीत येऊन अनुपस्थित राहण्याची परवानगी मागितली. सत्तेत राहून सातत्याने भाजप तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शिवसेनेकडून कुरापती काढण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याचे जाहीर केल्यानंतरही शिवसेनेने  विरोध सुरूच ठेवल्यामुळे भाजपच्या मंत्र्यांनी आता आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘वर्षां’वर काल भाजप मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीप्रकरणी सरकारने घेतलेला निर्णय तसेच शेतकऱ्यांचे आंदोलन आणि शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती देऊन मंत्र्यांना थेट जनतेत जाऊन भूमिका मांडण्यास सांगितल्याचेही प्रकाश मेहता म्हणाले. मुख्यमंत्री हे आमचे कुटुंबप्रमुख असून मंत्रिमंडळ त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे  उभे असल्याचेही मेहता म्हणाले.

शेतकऱ्यांच्या १ जूनपासून सुरू असलेल्या संपात मुख्यमंत्री एकाकी असून भाजप मंत्र्यांचा अथवा नेत्यांचा त्यांना पाठिंबा नसल्याचे चित्र विरोधकांनी रंगविण्यास सुरुवात केली. त्याचा समाचार घेताना प्रकाश मेहता म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेते सध्या परदेशात सुट्टीवर आहेत. तेथे  हे शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा कसा देऊ शकतात. ही मंडळी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या पोळ्या भाजून घेण्याचे काम करत असले तरी शेतकऱ्यांना खरे व खोटय़ामधील अंतर कळते. शेतकऱ्यांना फसविण्याचे उद्योग आता बंद करा, असे सांगून शिवसेनेचे मंत्री मंत्रिमडळाच्या बैठकीतून निघून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का, असा सवालही त्यांनी केला. तीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार असताना तसेच जलयुक्त शिवार, शेततळ्यापासून गेल्या अडीच वर्षांत शाश्वत शेतीसाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहे. यातून सिंचनाखाली मोठय़ा प्रमाणात जमीन आली असून  ५२ हजारांहून अधिक विहिरी बांधण्यात आल्या असून सर्व मंत्री आता थेट जनतेत जातील असे स्पष्ट केले.

शेतकऱ्यांनी सरकारसोबत चर्चा करावी- आठवले

ठाणे: राज्यात शेतकऱ्यांनी सुरू केलेला संप मागे घ्यावा, शेतकऱ्यांनी सरकार सोबत चर्चा केल्यावर त्यातून नक्की मार्ग निघू शकतो असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच राज्यात मध्यावती निवडणूका होऊ शकत नाही असा दावाही त्यांनी यावेळी केला. बुधवारी भाजप सराकारच्या कामगिरीबाबत ठाण्यात पत्रकार परिषदेतचे आयोजन केले होते.