उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महावितरणच्या कार्यालयात क्लार्कचं काम करावं म्हणजे आम्ही त्यांच्याकडे बिलं घेऊन तपासणीसाठी येतो. असा खोचक टोला विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. भाजपा नेत्यांनी वीज बिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं मी ती बिलं तपासून पाहिन असं नितीन राऊत यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. वाढीव वीज बिलं नसतील तर आम्ही सगळी बिलं भरु असं प्रॉमिस त्यांनी करावं असंही ते म्हणाले होते. आता त्यांना भाजपाच्या प्रविण दरेकरांनी खोचक टोला लगावला आहे.

भाजपा नेत्यांनी वीज बिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं, मी सर्व बिलं तपासून पाहिन जर वाढीव वीज बिलं नसतील तर भाजपा नेत्यांनी प्रॉमिस करावं की आम्ही सर्व वीज बिलं भरू असं काल झालेल्या पत्रकार परिषदेत नितीन राऊत म्हणाले होते. त्यांना आज खोचक टोला लगावत प्रविण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि क्लार्क म्हणून महावितरणमध्ये नोकरी पत्करावी मग आम्ही त्यांना बिलं दाखवायला येऊ. बिलं तपासणं हे काय मंत्र्याचं काम आहे का? असाही प्रश्न दरेकर यांनी विचराल. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उस्मानाबादमध्ये आलेल्या प्रविण दरेकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी १०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली. त्यावरही दरेकर यांनी टीका केली आहे. आधी १०० युनिट मोफत देण्याची घोषणा केली आणि आता म्हणत आहेत की सवलत देऊ. हे वीज ग्राहकांच्या जखमांवर मीठ चोळणं आआहे. महाविकास आघाडी सरकार जुलूम करणारं असून राज्या सध्या अस्थिरतेचं वातावरण आहे असंही प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.