उद्योगांचे पाणी मुख्यमंत्र्यांनी रोखले !
राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने धरणांतील पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच ठेवण्यात येईल, असे स्पष्ट करीत राज्यातील २७ उद्योगांना धरणांमधील पाणी राखून ठेवण्याचा जलसंपदा विभागाचा प्रस्ताव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी रोखून ठेवला. त्यामुळे या उद्योगांना पाणी मिळविण्यासाठी आता आणखी आठ-दहा महिनेही वाट पहावी लागण्याची शक्यता आहे. पुढील पावसाळ्यात धरणांत पुरेसा पाणीसाठा झाला, तरच त्यांना पाणी मिळणार आहे. पिण्याच्या पाणीयोजनांसाठी पाणी देण्याचे  ११ प्रस्ताव मात्र मंजूर करण्यात आले.
राज्यात तीव्र पाणीटंचाई असतानाही जलसंपदा विभागाने या उद्योगांना पाणी पुरविण्याचा प्रस्ताव दिला होता. धरणांमध्ये व नदीमध्ये पुरेसे पाणी असल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला होता आणि उद्योगांना पाणी पुरविण्याची शिफारस केली होती. पण जरी या धरणांमध्ये पाणी असले तरी ते तीव्र पाणीटंचाई असलेल्या विभागात रेल्वेवाघिणी किंवा टँकरद्वारे नेण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे सध्या तरी उद्योगांसाठी हे पाणी देता येणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली.
यामुळे उद्योगांवर विपरीत परिणाम होईल. उद्योगधंद्यांमध्ये वाढ करण्यासाठी पाणी पुरविणे गरजेचे आहे, असे मत काही मंत्र्यांनी व्यक्त केले. पण सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत उद्योगांना पाणी दिल्यास अडचणी वाढतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.