अर्थसंकल्पीय अधिवेशन लांबणीवर का टाकले? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

राज्यातील भाजप सरकार विधिमंडळ अधिवेशनांबाबत उदासीन असून, अर्थसंकल्पीय अधिवेशन लांबणीवर टाकण्यामागचे कारण काय हे स्पष्ट झाले पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार होते, पण हे अधिवेशन आठवडाभराने विलंबाने म्हणजेच २५ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात जाहीर होणार आहे. म्हणजेच राज्य विधिमंडळाचे अधिवेशन जेमतेम दीड आठवडय़ांचे होईल, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.

राज्य विधिमंडळाचे २०१८ मध्ये फक्त ४३ दिवस कामकाज झाले होते. फडणवीस सरकारच्या काळातील अधिवेशनाच्या कालावधीचा हा नीचांक आहे. विरोधात असताना भाजपकडून अधिवेशनाचा कालावधी कमी होत असल्याबद्दल काँग्रेस सरकारवर आरोप होत असे. पण भाजप सरकारच्या काळात अधिवेशनांचा कालावधी आणखीनच कमी कमी होत गेला आहे.

फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या उद्योगविषयक बैठकीसाठी विधिमंडळ अधिवेशन लांबणीवर टाकले का, असा सवालही चव्हाण यांनी केला. जागतिक पातळीवरील बैठकांमध्ये मुख्यमंत्र्यांनी जरूर सहभागी झाले पाहिजे. यातून गुंतवणुकीला पोषक वातावरण तयार होते. पण त्यासाठी विधिमंडळाच्या कामकाजाचा कालावधी कमी होत असल्यास ते चुकीचे ठरेल, असे मतही चव्हाण यांनी व्यक्त केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात फक्त चार महिन्यांच्या खर्चाचे लेखानुदान मांडण्यात येणार आहे. यामुळेच अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पूर्ण काळ अधिवेशन पार पडेल.     – गिरीश बापट, संसदीय कार्यमंत्री.