गोवा, महाबळेश्वरसह राज्यातील अन्य भागांत जाण्यासाठी खिशाला कात्री; कोकणात जाणाऱ्या गाडय़ांना मोठी प्रतीक्षा यादी

खासगी बसची भाडेवाढ, रेल्वे गाडय़ांना असलेली प्रतीक्षा यादी यामुळे नाताळच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईबाहेर जाणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. खासगी बस वाहतुकदारांनी भाडेदरात ३० ते ५० टक्के वाढ केल्यामुळे महाबळेश्वर, गोवा यासह राज्यांतील अन्य ठिकाणी जाणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागेल. ही भाडेवाढ २ जानेवारीपर्यंत आहे. याशिवाय नाताळच्या सुट्टीत पर्यटकांबरोबरच कोकणवासी मोठय़ा संख्येने कोकणात जात असल्याने या मार्गावरील गाडय़ांना २२ डिसेंबरपासून प्रतीक्षा यादीचा सामनाही करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांची दुहेरी कोंडीच झाली आहे.

गर्दीचा हंगाम सुरू होताच खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून भाडेवाढ केली जाते. शाळा, महाविद्यालयांना ही ख्रिसमसची सुट्टी सुरू होताच २१ डिसेंबरपासून भाडे दरात वाढ केली. यामुळे गोवा, महाबळेश्वर तसेच कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर, सांगली येथे जाणाऱ्या बस गाडय़ांच्या भाडय़ात वाढ झाली आहे. दादर, बोरिवली यासह मुंबईतील अन्य भागांत खासगी बस गाडय़ांचे आरक्षण करण्यासाठी सध्या बरीच विचारणा होत आहे. परंतु भाडेवाढ झाल्याचे समजल्यानंतरही पर्याय नसल्याने अनेक जण जादा भाडे देऊन आरक्षण करीत आहेत. मुंबई ते गोवा बिगरवातानुकूलित आसन गाडीचे ६०० रुपयांपर्यंत असलेले तिकीट आता १,२०० रुपयांपर्यंत तर वातानुकूलित स्लीपरचे ८०० ते एक हजार रुपयांपर्यंतचे भाडे २,५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. मुंबई ते महाबळेश्वरसाठीच्या भाडेदरात २०० ते ४०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर मुंबईतून राज्यातील अन्य मार्गावर जाणाऱ्या बस गाडय़ांच्या भाडय़ातही वाढ आहे.

ख्रिसमसच्या सुट्टीत गोवा, कोकणची निवड अनेक जण करतात. खासगी बसचे भाडे आणि प्रवासाला लागत असलेला विलंब यामुळे ट्रेनने जाण्याचा पर्याय निवडतात. परंतु कोकणात जाणाऱ्या गाडय़ांनाही २२ डिसेंबरपासून मोठी प्रतीक्षा यादी लागली आहे. तेजस एक्स्प्रेस, मांडवी, कोकणकन्या, जनशताब्दी एक्स्प्रेस यासह अन्य गाडय़ांचे तिकीट मिळवताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे.

खासगी बस भाडेदरात ३० ते ५० टक्के वाढ झाली आहे. शासनाने आखून दिलेल्या नियमानुसारच ही वाढ आहे. साधारण २ जानेवारीपर्यंत भाडेवाढ असेल.   – हर्ष कोटक, जनरल सेक्रेटरी, मुंबई बस मालक संघटना

२२ डिसेंबर रोजी सीएसएमटी ते करमाळी तेजस एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ५१६ पर्यंत पोहोचली होती. २९ डिसेंबपर्यंत ती २०० पर्यंत आहे. दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसच्या सेकंड सीटिंगसाठी ४०० च्या पुढे, मांडवी एक्स्प्रेसला ३०० तर कोकणकन्या एक्स्प्रेसला स्लीपर श्रेणीसाठी ३५० च्या पुढे प्रतीक्षा यादी आहे.