करोना जंतुसंसर्ग आजाराच्या पाश्र्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने दक्ष राहून नागरिकांना सतर्क करावे. रुग्ण तपासणी व उपचाराबाबत जागतिक आरोग्य संघटना व केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी. करोना जंतुसंसर्गाच्या तपासणीसाठी गरज पडल्यास खासगी प्रयोगशाळा आणि रुग्णालयांचीही मदत घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले.

वांद्रे येथील राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सभागृहात झालेल्या बैठकीस आरोग्य विभाग व मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

करोना जंतुसंसर्ग बाधित प्रांतातून आलेल्या प्रवाशांची तपासणी झाल्यानंतर पुढील २८ दिवस दैनंदिन त्यांचा पाठपुरावा करावा. अशा प्रवाशांना सर्दी, ताप, खोकला अशा स्वरूपाची लक्षणे जाणवतात का, अशी विचारणा यंत्रणेने त्यांना करावी, असेही या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सध्या वातावरणातील बदलांमुळे सामान्य स्वरूपाच्या सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण आहेत. अशाच स्वरूपाची लक्षणे करोना जंतुसंसर्ग झालेल्या रुग्णांतही आढळून येतात. त्यामुळे रुग्णांमध्ये फरक ओळखण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी २७ जानेवारीला राज्य साथरोग नियंत्रण समितीची बैठक घेण्याचा निर्णय या वेळी झाला.

तपासणीसाठी नमुन्यांची संख्या वाढली तरी त्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने सज्ज राहावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

आवश्यकता भासल्यास खासगी प्रयोगशाळा, मुंबईतील खासगी रुग्णालयांचीदेखील मदत घ्यावी. नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सजग करावे. रुग्णालयांमध्ये मास्कचा वापर, स्वच्छता, पुरेसा औषधसाठा याबाबत दक्षता घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्रात करोना आजाराचा अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, मात्र काळजी करू नये, असा दिलासाही मुख्यमंत्र्यांनी दिला.

विमानतळावर तपासणी : करोना व्हायरस आजाराच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी राज्य शासनाच्या वतीने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्कॅनरद्वारे प्रवाशांची तपासणी केली जात आहे. शुक्रवार, २४ जानेवारीपर्यंत २०५६ जणांची तपासणी करण्यात आली. ज्या तीन रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यातील दोघांचा चाचणी अहवाल आला असून त्यांना संसर्ग झाला नसल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिला आहे.