न्यायालयीन मराठीच्या लढय़ाचे अध्वर्यू शांताराम दातार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘मराठी भाषा आग्रही पुरस्कार’ भाषातज्ज्ञ प्रा. प्र. ना. परांजपे यांना जाहीर झाला आहे. तसेच भाषाभ्यासक जयवंत चुनेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या ‘प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कारा’साठी भूगोल विषयाचे शिक्षक व लेखक प्रा. विद्याधर अमृते यांची निवड झाली आहे. मराठी अभ्यास केंद्रातर्फे दिले जाणारे हे पुरस्कार न्या. हेमंत गोखले यांच्या हस्ते प्रदान केले जातील. हा सोहळा २७ फेब्रुवारीला विद्याविहार येथील के. जे. सोमय्या महाविद्यालयात दुपारी ३.३० वाजता होईल.

प्रा. परांजपे यांनी हैदराबादच्या ‘सीआयएफएल’ या संस्थेतून भाषाविज्ञानाचा सखोल अभ्यास करून एम. लिट. ही पदवी मिळवली आहे. त्यांच्या ‘भाषेतून भाषेकडे..भाषांतराकडे’ या ग्रंथाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘भाषा आणि जीवन’ या त्रमासिकाचे संपादक असताना त्यांनी अनेक नवोदित भाषाभ्यासकांना लिहिते केले. मराठीची परिभाषा, शुद्धलेखन आणि प्रमाणलेखन, मराठीचे अध्यापन, भाषांतर या विषयाबाबत प्रा. परांजपे यांचा सखोल अभ्यास होता. महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या वृत्तपत्रविद्या परिभाषा कोश आणि मराठी विश्वकोश यांसाठीही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. अमराठी व्यक्तींसाठी मराठी भाषेचा अभ्यासक्रम तयार करण्याच्या ‘माय मराठी’ प्रकल्पासाठी प्रा. परांजपे यांनी काम केले आहे. त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा ‘प्रा. राम शेवाळकर भाषाव्रती’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

प्रा. अमृते यांच्या अध्यापन कारकीर्दीची सुरुवात साठय़े महाविद्यालयात झाली. बालभारतीच्या जवळपास ३० पुस्तकांच्या संपादनात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. बंदिस्त चौकटीत न रमता भूगोल आणि पर्यावरण विषयांतील विविध प्रयोग त्यांनी केले. शिक्षणाबाबतच्या सखोल दृष्टिकोनातूनच ते शिक्षणपत्रिका, कोसबाड वार्तापत्र, भूगोल अध्यापक यांच्या संपादनात महत्त्वाचे योगदान देऊ शकले. ‘भूगोल अध्यापक’मधून तर भूगोलाची गोडी मुलांना लावणारे अनेक शिक्षक घडले. प्रा. अमृते यांचे ‘मुलांचा चित्रमय महाराष्ट्र’ हे पुस्तक सर्वदूर नावाजले. पाठय़पुस्तकातील चुका आणि शिक्षणाबाबतचे प्रतिकूल निर्णय यांविषयी वेळोवेळी त्यांनी आपली मते व्यक्त केली. सध्या ते क ोसबाड येथील ग्राम बाल शिक्षा केंद्रासाठी काम करत आहेत.

मराठीच्या चळवळीबाबत परिसंवाद : मराठी भाषेच्या चळवळीसाठी भरीव कामगिरी करणारे डॉ. दत्ता पवार यांचाही ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. तसेच ‘मराठीच्या चळवळीची सद्य:स्थिती आणि आव्हाने’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यात सामाजिक कार्यकर्ते दत्ता बाळसराफ, मराठीच्या समाजमाध्यमांवरील चळवळीतील कार्यकर्ते मयूर घोडे आणि मराठीच्या प्राध्यापिक अनघा मांडवकर सहभागी होतील.