उत्तरपत्रिका तपासणी प्रकरण

मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन पद्धतीने तपासणी करण्याचा प्रयोग पूर्णपणे फसला असून केवळ राज्यपालांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी घाईगडबडीत उत्तरपत्रिका तपासणी करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये, अशी मागणी आता बॉम्बे युनिव्‍‌र्हसिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर युनियनकडून (बुक्टू) केली जात आहे. यासाठी येत्या सोमवारी १७ जुलै रोजी विद्यापीठाच्या फोर्ट आवारामध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थी एकत्रितरित्या आंदोलन करणार आहेत.

कोणत्याही पूर्वतयारीविना ऑनलाइन उत्तरपत्रिकांची तपासणी करण्याच्या निर्णयामुळे निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या संधी वाया जात आहेत. राज्यपालांनी कानउघाडणी केल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या विद्यापीठाने उत्तरपत्रिका तपासणीचे काम घाईगडबडीने उरकणे सुरू केले आहे. वर्षभर मेहनत करून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत. तेव्हा उत्तपत्रिका योग्यरितीने तपासल्या नाहीत तर त्यांची मेहनत वाया जाईल आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, हे लक्षात घेऊन उत्तरपत्रिकांची तपासणी योग्यरितीने आणि योग्य व्यक्तींमार्फतच व्हावी, अशी मागणी ‘बुक्टू’ने केली आहे. रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी प्राध्यापकांना दिवसाला ३० उत्तरपत्रिका तपासाव्यात, आत्तापर्यत तपासलेल्या उत्तरपत्रिकांची माहिती द्यावी, अशी रोज नवनवीन पत्रके काढून विद्यापीठातर्फे सूचना दिल्या जात आहेत.

याचा निषेध करण्यासाठी ‘बुक्टू’तर्फे विद्यापीठाविरोधात प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा एकत्रित मोर्चा सोमवारी दुपारी ३ वाजता काढण्यात येणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लावण्याच्या घाईत होणारे घोटाळे टाळण्यासाठी स्वत कुलगुरुंनी लक्ष घालून या कामावर देखरेख करावी, प्राध्यापकांना धमकीवजा सूचना देणारी पत्रके माघारी घ्यावीत आणि उत्तरपत्रिकांच्या तपासणीचा दर्जा न खालवता निकाल जाहीर करावेत, अशी मागणी करण्यात येणार आहे.