News Flash

‘विंदां’च्या जन्मशताब्दीनिमित्त साहित्यदर्शन सोहळा

‘एटू लोकांचा देश’ खरेतर विंदांनी आपल्या मुलाकरिता म्हणजे उदय करंदीकर यांच्याकरिता लिहिले होते.

ज्ञानपीठ’विजेते कविवर्य विंदा करंदीकर

माध्यम प्रायोजक ‘लोकसत्ता’;  यशवंतराव चव्हाण केंद्रात आज कार्यक्रम

कवितेत रंजकतेबरोबरच वैचारिकताही तितक्याच ताकदीने उतरविणारे ‘ज्ञानपीठ’विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या साहित्याचे दर्शन घडविणारा आगळावेगळा कार्यक्रम बुधवारी (२३ ऑगस्ट) मुंबईत आयोजिण्यात आला आहे.

‘पॉप्युलर प्रकाशन’तर्फे होणाऱ्या या कार्यक्रमाचा ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक आहे. ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’चेही सहकार्य या कार्यक्रमाला लाभले आहे. गोविंद विनायक ऊर्फ ‘विंदा करंदीकर’ यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८चा. कवी, लेखक व समीक्षक अशी बहुपेडी ओळख असलेल्या या मराठी साहित्यातील पितामहांना त्यांच्या ‘अष्टदर्शने’ या साहित्यकृतीकरिता प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. या शिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान मिळाले. मराठी बालकवितेत विंदांनी जो ठसा उमटविला त्याला तोड नाही. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचवली.

‘एटू लोकांचा देश’ खरेतर विंदांनी आपल्या मुलाकरिता म्हणजे उदय करंदीकर यांच्याकरिता लिहिले होते. परंतु पुढे प्रकाशनानंतर या ‘देशा’ने मराठी साहित्य, खासकरून बालकांचे विश्वच काबीज केले. अजूनही या पुस्तकाचे गारूड कायम आहे. अशा या पुस्तकाच्या निर्मितीमागील कथा उदय करंदीकर या वेळी उलगडणार आहेत. याचबरोबर ‘विंदां’चे द्वितीय चिरंजीव आनंद करंदीकर आणि कन्या जया काळे विंदांच्या कवितांचे सादरीकरण करणार आहेत. मुलांच्या नजरेतून विंदांच्या साहित्याचा प्रवास अनुभवल्यानंतर साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून रसिकांना विंदांच्या साहित्याचे दर्शन घडविले जाईल.

ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्रा विंदांच्या ललित साहित्यावर या वेळी बोलणार आहेत, तर कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम लघुनिबंधातून विंदांच्या काव्याचे आणि साहित्याचे दर्शन घडवतील. विंदांच्या आवाजातील ध्वनिफीत या वेळी ऐकविली जाणार असून साहित्य रसिकांकरिता ही आगळीवेगळी मेजवानी ठरेल. पॉप्युलरचे रामदास भटकळ देखील या वेळी विंदांसोबतच्या आपल्या मैत्रीचा पट उलगडणार आहेत. यशवंतराव चव्हाण केंद्रात २३ ऑगस्टला सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होईल. या वेळी ‘समग्र विंदा’ आणि ‘विंदा करंदीकर बालकविता संच’ हे अनुक्रमे एक हजार रुपये व अकराशे रुपये किमतीचे ग्रंथ सवलतीच्या किमतीत रसिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2017 1:01 am

Web Title: program organized in mumbai on the birth anniversary of vinda karandikar
Next Stories
1 मेट्रो कारशेडबद्दलचे निरुपम यांचे सर्व आरोप बिनबुडाचे; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
2 हार्बर रेल्वेवरील वाहतूक ठप्प, वडाळा- अंधेरीदरम्यान तांत्रिक बिघाड
3 ‘आरे कारशेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा १८ हजार कोटींचा घोटाळा’
Just Now!
X