पुण्यातील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ विद्यापीठात विद्यार्थ्यांवर धार्मिक संस्कार करण्यासाठी सुरू असलेल्या महायज्ञाचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निषेध केला आहे.

एखाद्या शैक्षणिक संस्थेत असे कार्यक्रम आयोजित करणे हे नक्कीच निषेधार्ह आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याऐवजी भ्रामक विज्ञानावर आधारित, कालबाह्य़ झालेले कर्मकांड करायला लावणे हे विद्यार्थ्यांना अंधश्रद्ध करण्यास कारणीभूत ठरेल. धर्म वैयक्तिकरीत्या पाळावा, शैक्षणिक संस्थेत धार्मिक कर्मकांड असू नयेत हा संकेतही संस्थेने मोडला आहे. संविधानातील धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचेही संस्थेने उल्लंघन केले आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या वेळेत घडणाऱ्या या प्रकारांमुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. समाजसुधारकांची मोठी परंपरा असणाऱ्या पुण्यात अशा गोष्टी घडाव्यात हे खेदजनक आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या प्रकारचा निषेध करत आहे, असे पत्रक समितीने काढले आहे.