अतुल देऊळगावकर

मुंबई : मुंबईकरांसाठी आरेचे जंगल सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञ पवन सुखदेव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.  ‘निसर्गाचे अर्थशास्त्र हे अदृश्य असल्यामुळे आपण निसर्गाला किंमतच देत नाही. अरण्य म्हणजे अतिशय विराट पर्यावरणीय यंत्रणा असते. आरे हे असेच अनन्यसाधारण महत्त्वाचे अरण्य आहे. त्यापासून किती क्षेत्रफळामधील रहिवाशांना लाभ मिळतात, हे ठरवता येऊ शकते. हे लाभ केवळ आर्थिकच नव्हेत, तर आरोग्याशीही संबंधित आहेत. आरे हे पूर, उष्णतेची लाट यांसारख्या अनेक आपत्तींची जोखीम कमी करणारे आघात प्रतिबंधक क्षेत्र (बफर) आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी आरेचे जंगल सुरक्षित असायला हवे, असे सुखदेव म्हणाले.

निसर्गाचे अदृश्य अर्थशास्त्र उलगडून दाखविणाऱ्या सुखदेव यांना टायलर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पर्यावरणातील नोबेल अशी या पुरस्काराची ख्याती आहे. त्यांनी कारशेडच्या मुद्यावरही भाष्य केले. काही जणांच्या नफ्यासाठी सावर्जनिक जागांना नष्ट करणे हे सर्वथा गैर आहे. कारशेडसाठी इतर पर्यायांचा विचार करून योग्य जागा निवडता येऊ शकते. माझा ‘मेट्रो’ला विरोध नाही, परंतु त्याकरिता वृक्षतोड करून जंगलाचा विनाश करण्यास विरोध आहे. आरेचे मूल्य समजून घ्यायचे असेल, तर याबाबत निशुल्क अभ्यास करण्यास मी तयार आहे, असेही सुखदेव यांनी सांगितले.