एका टॅक्सीचालकाकडून ५ हजारांची लाच घेणाऱ्या जुहू पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मिथुन सावंत यांना लाचलुतपत प्रतिबंधात्मक विभागाने शुक्रवारी सापळा लावून अटक केली.
एका टॅक्सीचालकाला वाहतूक पोलिसांनी कारवाई करून जुहू पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या टॅक्सीचालकाला जामिनावर सोडण्यासाठी जुहू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मिथुन सावंत यांनी ३० हजार रुपये मागितले होते. त्यावेळी मित्राने २ हजार रुपये दिले होते. जामिनावर सुटल्यानंतर हा टॅक्सीचालक आपली जप्त केलेली टॅक्सी परत घेण्यासाठी गेला असता सावंत यांनी पुन्हा १० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे टॅक्सीचालकाने लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शुक्रवारी जुहूच्या पुष्पा गार्डनजवळ लाच घेताना सावंत यांनी पाठवलेल्या प्रकाश कालेगौडा याला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर पोलीस ठाण्यातून सावंत यांना अटक करण्यात आली.