राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २०१५-१६ या वर्षांसाठीच्या पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ सारंगीवादक पं. राम नारायण यांची निवड करण्यात आली आहे. शास्त्रीय गायन आणि वादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तीला या पुरस्काराने गौरविण्यात येते. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी मुंबईत ही घोषणा केली. तावडे यांच्या अध्यक्षतेखालील पं. भाई गायतोंडे, उस्ताद राजा मियॉं, पं. विजय कोपरकर, पं. केशव गिंडे, पं. सुरेश तळवलकर, पं. नाथराव नेरळकर, कमलाताई भोंडे, कल्याणी देशमुख यांच्या समितीने ही निवड केली. या पूर्वी गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं. जसराज, प्रभा अत्रे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात एकल सारंगी वादनाने पं. राम नारायण यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कलेचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. त्यांनी देशात आणि परदेशात सारंगीवादनाचे कार्यक्रम सादर केले आहेत. देशात आणि परदेशातही त्यांचे अनेक शिष्य आहेत. पं. राम नारायण यांच्या योगदानाची दखल घेऊन केंद्र शासनाच्या पद्मविभूषण या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.