‘हागणदारीमुक्ती’साठी पालिकेचा निर्णय

शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी आता शौचालयांची रात्रपाळीही सुरू होणार आहे. सुरक्षितता तसेच देखभालीच्या दृष्टीने रात्री ११ ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत काही सार्वजनिक शौचालये बंद ठेवण्यात येत होती. मात्र रहिवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तसेच उघडय़ावरील हागणदारी पूर्ण दूर करण्यासाठी शौचालये रात्रंदिवस सुरू ठेवण्याच्या सूचना महानगरपालिकेने शौचालयांची देखभाल करणाऱ्या संस्थांना दिल्या आहेत.

शहरातील सुमारे ५० लाखांहून अधिक नागरिक झोपडपट्टय़ांमध्ये राहतात. नैसर्गिक विधीसाठी त्यांना सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून राहावे लागते. शहरातील २४ विभागांमध्ये सुमारे दहा हजार सार्वजनिक शौचालये आहेत. यात फिरत्या तसेच पे अ‍ॅण्ड युझ शौचालयांचाही समावेश आहे. शुल्क घेतले जाणारी तसेच वस्तीपातळीवर व्यवस्थापन असलेली शौचालये रात्रंदिवस सुरू असतात. मात्र शौचालयांची अपुरी संख्या तसेच रात्री शौचालये बंद असल्याने अनेकांना उघडय़ावर शौचास बसावे लागते. त्यामुळे एकीकडे शौचालयांची संख्या वाढवण्यासोबत ही सेवा रात्रंदिवस सुरू ठेवण्याचा निर्णय पालिका स्तरावर घेतला गेला आहे.

मोफत वापरता येणारी तसेच फिरती शौचालये रात्री ११ ते ४.३० या वेळेत बंद ठेवली जातात. मात्र उघडय़ावरील हागणदारी पूर्ण बंद करायची असेल तर शौचालयांची सेवा २४ तास देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व व्यवस्थापकांना रात्रीही शौचालये वापरू देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. येत्या आठवडय़ाभरात त्याची अंमलबजावणी सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डी. एन. नगर येथील सार्वजनिक शौचालय पहाटे साडेचार ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असते. हे शौचालय रात्री सुरू ठेवण्याबाबत पालिकेची नोटीस आलेली नाही. मात्र नोटीस आली तर त्या वेळेत शौचालय सुरू ठेवायला हरकत नाही, असे सुविधा सामाजिक संस्थेमार्फत शौचालयाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या अनुराधा बांदेकर म्हणाल्या.

देवनार, पी. लोखंडे मार्ग आणि छेडा नगर येथील शौचालयांचे व्यवस्थापन आम्ही पाहतो. तिथे सुरू असलेल्या जुगारांच्या अड्डय़ांचा त्रास होत असल्याने आम्ही शौचालये बंद ठेवतो. मात्र तिथे आमचा माणूस २४ तास उपलब्ध असतो.  इतर ठिकाणी अशी माणसे नसल्याने समस्या येऊ शकतात, असे रघुनाथ सरवदे यांनी सांगितले.

हागणदारी मुक्तीचा दावा किती खरा?

मुंबईतील २० विभाग हागणदारी मुक्त झाल्याचा पालिकेचा दावा आहे. मात्र वांद्रे पूर्व येथे रेल्वे टर्मिनसच्या भिंतीजवळ तसेच जलवाहिनीजवळ रोज सकाळी उघडय़ावर शौचास बसले जाते. वांद्रे पूर्व येथील गरीब नगर तसेच इंदिरा नगर येथील वस्तीतील सुमारे साडेसहाशे कुटुंबांना वस्तीत शौचालय उपलब्ध नाही, असे हमारा शहर मुंबई अभियानचे कार्यकर्ते राजीव वंजारे म्हणाले.