सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील गैरव्यवहाराची विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत महिनाभरात चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी सोमवारी विधानसभेत केली.

विजय काळे, भीमराव तापकीर आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान वायकर यांनी ही घोषणा केली. या विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका’ योजना राबविली जाते. या योजनेत सहभागी विद्यार्थ्यांना श्रमाच्या मोबदल्यात देण्यात येणारे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा होते. मात्र विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांनी बनावट विद्यार्थी दाखवून मानधनाची रक्कम परस्पर हडप केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रशांत बंब यांनी केली होती.

या योजनेत अनियमितता झाल्याचे निदर्शनास येताच विद्यापीठ प्रशासनाने सखोल चौकशीसाठी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसुळ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. ही समिती महिनाभरात चौकशी अहवाल देईल, अशी ग्वाही वायकर यांनी यावेळी दिली.