प्रसाद रावकर

नरिमन पॉइंट, मरिन ड्राईव्ह आणि गिरगाव चौपाटीच्या वैभवात भर घालणारा ‘राणीचा रत्नहार’ पाहता यावा यासाठी मुंबई महापालिकेने मलबार हिलच्या पायथ्याशी समुद्रकिनाऱ्यालगत दर्शनी गॅलरी उभारण्याचा संकल्प सोडला आहे. या प्रकल्पाला गिरगाव चौपाटी उच्चस्तरीय समितीने हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र सागरी किनारा नियमन क्षेत्रविषयक (सीआरझेड) मंजुरी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अथांग समुद्र आणि ‘राणीच्या रत्नहारा’चे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठय़ा संख्येने नरिमन पॉइंट, मरिन ड्राईव्ह आणि गिरगाव चौपाटीवर येत असतात. त्याचबरोबर मुंबईकरांचाही येथे राबता असतो. मुंबईच्या वैभवात भर घालणऱ्या ‘राणीचा रत्नहारा’चे पर्यटकांना दर्शन घेता यावे यासाठी पालिकेने मलबार हिलच्या पायथ्याशी असलेल्या तांबे चौकाची जागा निवडली आहे. गिरगाव चौपाटीच्या आसपासच्या परिसरातील पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे भूमिगत जाळे उभारण्यात आले आहे. तांबे चौकाखालून जाणाऱ्या पर्जन्य जलवाहिनीतून पावसाचे पाणी समुद्रात सोडले जाते. किनाऱ्यालगतच्या पर्जन्य जलवाहिनीचा आधार घेत तेथे दर्शनी गॅलरी उभारण्याचा आराखडा पालिकेने आखला आहे. पर्यटकांना सूर्यास्ताचे दर्शन घेता यावे या दृष्टीने तेथे आसनव्यवस्था करण्यात येणार आहे. एका वेळी ४० व्यक्ती उभ्या राहू शकतील इतकी ही गॅलरी मोठी असणार आहे. या गॅलरीत उभे राहून ‘राणीच्या रत्नहारा’सह सेल्फी घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. या ठिकाणी एक छोटेखानी अ‍ॅम्फी थिएटरही उभारण्यात येणार आहे.

सध्या तांबे चौकालगत किनाऱ्यावर एक छोटी पोलीस चौकी आहे. सुशोभीकरणात चौकीचीही डागडुजी, रंगरंगोटी करण्यात येणार आहे. गॅलरी उभारण्यात आल्यानंतर पर्यटकांना एक नवा पर्यायही उपलब्ध होईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

पर्यटकांना गिरगाव चौपाटीपासून नरिमन पॉइंटपर्यंतचे समुद्रकिनाऱ्याचे दर्शन घडावे यासाठी तांबे चौकात दर्शनी गॅलरी उभारण्यात येणार आहे. आवश्यक असलेली गिरगाव चौपाटी उच्चस्तरीय समितीची परवानगी मिळाली आहे. लवकरच सीआरझेडबाबतची परवानगीही मिळेल.

– प्रशांत गायकवाड, साहाय्यक आयुक्त, ‘डी’ विभाग