काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई : परमबीर सिंह पोलीस आयुक्त असताना त्यांच्या कार्यालयातून मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाचा ‘डीव्हीआर’ गायब झाला असून राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) याची चौकशी का करीत नाही,असे सवाल प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहेत. हे डीव्हीआर गायब करण्यामागे परमबीर सिंह यांचा हात आहे का, याची चौकशी एनआयएने करावी आणि एनआयए करीत नसेल तर राज्य सरकारने ती करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले की, १० मार्च २०२१ रोजी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसराचा डीव्हीआर एटीएसने अधिकृतरीत्या ताब्यात घेतला. परंतु दोनच तासांमध्ये हा डीव्हीआर एटीएसला देऊन चूक झाली असे लक्षात आल्याने एटीएसचे प्रमुख जयजितसिंह यांना परमबीर सिंह यांच्या कार्यालयातून दूरध्वनी गेला. तो हा कोणी केला हे स्पष्ट आहे व चौकशीअंती समोर येईल.  परंतु  डीव्हीआरमध्ये स्पष्ट दिसत नाही, असे कारण देऊन तो नंतर तपासून परत देऊ असे सांगून परमबीर सिंह यांच्या कार्यालयामधून अधिकाऱ्याला पाठवून तो ताब्यात घेण्यात आला होता. त्यानंतर हा डीव्हीआर गायब झाला आहे.

या डीव्हीआरमध्ये स्कॉर्पिओ, इनोव्हा गाड्यांची ये-जा, सचिन वाझे व अन्य अधिकारी कोणाच्या संपर्कात होते, हे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे महत्त्वाचा पुरावा गायब केला गेला तरी गेले १८ दिवस एनआयएने सचिन वाझेच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला जबाबासाठी बोलावले नाही, हे आश्चर्यकारक आहे असे सावंत यांनी  सांगितले.