‘केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे देशातील शैक्षणिक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होतील. यामुळे देशातील तरुणाईला फायदा होईल. तसेच विद्यार्थ्यांना शिकवणारे दर्जेदार शिक्षकही घडतील,’ अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थान (नीटी) यांच्यातर्फे  शुक्रवारी आयोजित केलेल्या ‘नवीन राष्ट्रीय धोरण – भारतीय मूल्यांचे शिक्षणातील योगदान’ या विषयावरील कार्यक्रमात त्यांनी दूरचित्रसंवादाद्वारे संवाद साधला.

या संवादात खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अनिरुद्ध देशपांडे, एनआयटीआयई बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष प्रा. संजय धांडे, एनआयटीआयईचे सदस्य अतुल कुलकर्णी सहभागी झाले होते. कार्यक्र माच्या सुरुवातीला अतुल कुलकर्णी यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची माहिती दिली. नवीन शिक्षण धोरणात विद्यार्थ्यांच्या शिक्षणास प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे निटी देशाच्या शैक्षणिक विकासात मोलाची भूमिका बजावत असल्याचे मत संजय धांडे यांनी व्यक्त केले. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होईल, असे मत डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी नोंदवले. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे मत डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांनी व्यक्त केले.