बऱ्याच काळानंतर झालेल्या रेल्वेदरवाढीला सर्वच स्तरांतून विरोध झाला असला, तरी रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीने ही वाढ खूपच किरकोळ आहे. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांची तुलना केल्यास रेल्वे सर्वात स्वस्त आणि सर्वात वेगवान सेवा देणारी व्यवस्था आहे. सध्या मुंबईत पाच रुपयांमध्ये साधा वडापाव किंवा शेंगदाणेही मिळत नसताना चर्चगेट आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून दादपर्यंतचे तिकीट मात्र नक्कीच मिळते. विशेष म्हणजे बेस्ट, रिक्षा, टॅक्सी यांपैकी एकाही वाहतूक व्यवस्थेचे किमान तिकीट एवढे कमी नाही. मात्र रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांची तुलना करणे अव्यवहार्य असल्याचे मत प्रवासी संघटना व्यक्त करतात.
रेल्वे मंत्रालयाने मासिक पास दुपटीने वाढवल्यानंतर मुंबईभर आंदोलने झाली. भाजप आणि सेनेच्या खासदारांनीही या प्रचंड दरवाढीविरोधात भूमिका घेतली. त्यानंतर ही दरवाढ मागे घेऊन फक्त १४.२ टक्के वाढ लागू करण्यात आली. ही दरवाढ योग्य असून यापेक्षा थोडी जास्त दरवाढ झाली, तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमध्ये रेल्वेची सेवा अत्यंत अल्प दरांत मिळत आहे, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यासाठी बेस्ट, रिक्षा, टॅक्सी आणि रेल्वे यांच्या प्रतिकिमीसाठी आकारल्या जाणाऱ्या दरांची तुलना केली आहे.
रेल्वेचा हा युक्तिवाद प्रवासी संघटना मात्र फेटाळून लावत आहेत. बेस्ट आणि रेल्वे यांची तुलना होणे शक्य नाही. बेस्टमध्ये एका वेळी १०० प्रवासी प्रवास करत असतील, तर रेल्वेच्या एका डब्यात ४०० ते ५०० प्रवासी असतात. तसेच रेल्वे पेट्रोल किंवा डिझेल अशा इंधनावर चालत नाही. त्यामुळे त्या दरवाढीचा फटका रेल्वेला बसत नाही, असे रेल्वे प्रवासी कार्यकर्ते सुभाष गुप्ता यांनी सांगितले. रेल्वेने असा युक्तिवाद करण्याऐवजी आपली सेवा अधिकाधिक चांगली आणि वक्तशीर करण्यावर भर द्यायला हवा, असे ते म्हणाले.
प्रतिकिमी ५६ पैसे दर
रेल्वे दादर ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या ९ किमीच्या प्रवासासाठी पाच रुपये आकारते. म्हणजेच प्रतिकिमी ५६ पैसे दराने रेल्वेचे तिकीट मिळते. मात्र टॅक्सीसाठी हाच दर प्रतिकिमी १२ रुपये आणि बेस्टसाठी १.५० रुपये इतका आहे. घाटकोपरच्या २० किलोमीटरच्या प्रवासासाठी रेल्वे १० रुपये आकारते, तर बेस्ट याच प्रवासासाठी २० रुपयांपेक्षा जास्त दर घेते. टॅक्सीने हा प्रवास २०० रुपयांच्या घरात जातो.