रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांकरीता तसेच स्थानकातील गैरसोयींविरोधात रेल रोको आंदोलन करण्यासाठी बुधवारी स्थानिक नेत्यांसह प्रवाशी कळवा रेल्वे स्थानक परिसरात जमले होते. मात्र, रेल्वेचे विशेष कार्य अधिकारी राजीव त्यागी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी रेल रोको मागे घेण्याचा निर्णय घेतला.
कळवा रेल्वे स्थानकातील गैरसोयींविरोधात तसेच प्रवाशांच्या विविध समस्यांसाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, बुधवारी रेल रोको आंदोलन करण्यासाठी आमदार आव्हाड, खासदार आनंद परांजपे आणि प्रवासी कळवा स्थानकात जमले होते. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात मोठय़ाप्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, आंदोलनाआधीच रेल्वेचे कार्य अधिकारी राजीव त्यागी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत आंदोलनकर्त्यांच्या बहुतांश मागण्या त्यागी यांनी मान्य केल्या. त्यामध्ये रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण, खारेगाव रेल्वे ओव्हर ब्रीज, शिवाजीनगर येथे पादचारी पुल, वाहनतळाची व्यवस्था, सुसज्ज तिकीट घर, प्रसाधनगृह, आदी कामांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान, बहुतांश मागण्या रेल्वे अधिकाऱ्यांनी मान्य केल्याने आंदोलनकर्त्यांनी रेल रोको आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.