रेल्वे कर्मचारी उद्घोषक बनण्यास अनुत्सुक; २८ स्थानकांपाठोपाठ आणखी १३ स्थानकांतील उद्घोषणेसाठी कंत्राट
‘प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर येणारी जलद लोकल आज प्लॅटफॉर्म क्रमांक पाचऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर येत आहे..’ अशा प्रकारची उद्घोषणा नेहमी ऐकण्याची सवय असलेल्या मुंबईकरांच्या कानांवर आता नवीन आवाजात ही उद्घोषणा पडणार आहे. रेल्वेने आपल्याच सेवेतील उद्घोषकांच्या कमतरतेमुळे आता कंत्राटी पद्धतीने उद्घोषकांच्या जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी प्रायोगिक तत्त्वावर छोटय़ा स्थानकांमध्ये केलेला प्रयोग रेल्वे विस्तारणार असून सुरुवातीच्या २८ स्थानकांपाठोपाठ आता १३ नव्या स्थानकांवरही कंत्राटी पद्धतीने उद्घोषक नेमण्यात येणार आहेत.
रेल्वेमध्ये पूर्वी विविध विभागांतून उद्घोषकांसाठी निवड होत होती. इतर विभागांमध्ये नोकरी करत असलेल्या, पण त्या विभागात काम करण्याची फारशी इच्छा नसलेल्या कर्मचाऱ्यांना उद्घोषक पदाचा पर्याय दिला जायचा. या पदावर बढती किंवा इतर वाढीची शक्यता नसते. त्यामुळे अंगमेहनतीचे काम असलेले अनेक कर्मचारी या पदाकडे वळत होते. मात्र या पदावर वाढीची शक्यता नसल्याने सध्या या पदाकडे रेल्वे कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अनेक स्थानकांवर उद्घोषकांची कमतरता जाणवत होती.
रेल्वेने याबाबत विचार करत गेल्या वर्षी ट्रान्स हार्बर, हार्बर आणि मुख्य मार्गावरील काही स्थानके अशा २८ स्थानकांवर खासगी उद्घोषकांची नेमणूक केली होती. या स्थानकांमध्ये ट्रान्स हार्बर मार्गावरील सर्व स्थानकांचा समावेश आहे. मुख्य मार्गावरील करीरोड, कोपर, ठाकुर्ली, मशीद अशा स्थानकांवरही कंत्राटी उद्घोषक आहेत. त्यातच आता रेल्वेने आणखी १३ स्थानकांवर उद्घोषक कंत्राटी पद्धतीनेच नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेच्या सेवेतील कर्मचारी उद्घोषक म्हणून काम करण्यास उत्सुक नसल्याने रेल्वेला उद्घोषकांचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे रेल्वेच्या उद्घोषकांना मोठय़ा स्थानकांची जबाबदारी देऊन छोटय़ा छोटय़ा स्थानकांसाठी कंत्राटी पद्धतीने उद्घोषक नेमण्याची प्रक्रिया रेल्वेने
सुरू केली. या प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद मिळत असून आता लवकरच सर्व छोटय़ा स्थानकांवर कंत्राटी उद्घोषक नेमले जातील, अशी माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.