रेल्वे, मेट्रोची कामे सुरू असलेल्या ठिकाणांची पालिका पाहणी करणार

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी विविध यंत्रणांची विकास कामे सुरू असून या कामांमधील निष्काळजीपणा, तसेच कामचुकारपणामुळे पावसाळ्यात काही भाग जलमय होऊन त्याचा थेट मुंबईकरांना फटका बसतो. त्यामुळे पालिकेने आतापासूनच मुंबईतील ‘जलग्रस्त’ भागांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे रेल्वे आणि मेट्रोचे काम सुरू असलेल्या भागांवर पालिका अधिकाऱ्यांना लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘जलग्रस्त’ भागांची यादी तयार झाल्यानंतर ती संबंधित यंत्रणेकडे सोपविण्याचा पालिकेचा इरादा आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील सखल भाग जलमय होतात आणि त्यामुळे मुंबईकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही वेळा मुसळधार पावसात रस्ते आणि रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन मुंबई ठप्प होते.

शहरातील काही भाग जलमय होण्याच्या घटनांची प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती. पालिका उपायुक्तांची एक विशेष बैठक सोमवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बोलावली होती. पावसाळ्यातील ‘जलग्रस्त’ भागांची यादी तयार करण्याचे आदेश अजोय मेहता यांनी बैठकीमध्ये उपायुक्तांना दिले. गेल्या पावसाळ्यात एल्फिन्स्टन येथील पाण्याचा निचरा होऊ शकला नव्हता. रेल्वेच्या हद्दीत कंत्राटदाराने टाकलेला ओंडका पाण्याच्या मार्गात अडथळा बनला होता. त्यामुळे रेल्वेच्या हद्दीतील पाण्याचा निचरा होणाऱ्या जागांची पाहणी करावी. त्याचबरोबर मुंबईत अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर मेट्रोची कामे सुरू आहेत. या कामांमुळे पावसाच्या पाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी पाहणी करावी. ‘जलग्रस्त’ स्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची रेल्वे आणि मेट्रोला तात्काळ कल्पना द्यावी, असे आदेश अजोय मेहता यांनी उपायुक्तांना दिले आहेत.अजोय मेहता यांच्या आदेशानुसार मुंबईतील ‘जलग्रस्त’ भागांची पाहणी करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार आहे. यादी तयार झाल्यानंतर ती संबंधित यंत्रणांनाही उपलब्ध केली जाईल, असे पालिकेतील एका उपायुक्ताने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर बोलताना सांगितले.

ओंडके आणि सीमेंटच्या गोणी

* गेल्या वर्षी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे एल्फिन्स्टन परिसरातील पाण्याचा निचरा होत नव्हता. अखेर पालिका अधिकाऱ्यांनी भल्या पहाटे एल्फिन्स्टन आणि परळ रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे मार्गावर धाव घेतली आणि पाहणी केली. या पाहणीत रेल्वेच्या हद्दीतील छोटय़ा नाल्यात रेल्वे मार्गातील लाकडाचे ओंडके अडकल्याचे निदर्शनास आले होते. हे ओंडके काढून टाकल्यानंतर एल्फिन्स्टन परिसरात साचलेल्या पावसाच्या पाण्याचा झटपट निचरा झाला.

* मेट्रो रेल्वेचे काम सुरू असलेल्या वांद्रे परिसरातही झाली होती. मुसळधार पावसानंतर वांद्रे पूर्व भागात तब्बल दोन दिवस पाणी तुंबले होते. पावसाच्या पाण्याचा निचरा होणाऱ्या ठिकाणी सिमेंटच्या गोणी आढळून आल्या होत्या. सिमेंटच्या गोणींच्या अडथळ्यामुळे पाण्याचा मार्ग रोखला गेला होता. परिणामी वांद्रे पूर्व परिसरातील काही भाग जलमय झाला होता.