रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची कबुली
देशभरातील रेल्वेच्या जाळ्यापेक्षाही मुंबईतील उपनगरीय रेल्वेसमोरील अडचणी जास्त असून येथे खडतर आव्हानांचा सामना करावा लागतो. यामुळे प्रवाशांचेही प्रचंड हाल होत आहेत, अशी कबुली रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी दिली. मुंबई सेंट्रल येथे ‘जगातील सर्वात वेगवान’ वाय-फाय सेवेच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना त्यांनी हे मत मांडले. या अडचणी सोडवण्यासाठी अल्प, मध्य आणि दीर्घकालीन उपायांची आवश्यकता असल्याचे सांगत त्यासाठी निधी उभारण्यासाठी बोलणी सुरु असल्याचे स्पष्ट केले.
उपनगरीय रेल्वेमार्गासमोरील आव्हाने खूप खडतर आहेत. भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येच्या ३५ टक्के प्रवासी येथे प्रवास करतात. प्रवाशांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे खुद्द रेल्वेमंत्री प्रभू यांनीच सांगितले. ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. वर्ल्ड बँकेकडून मुंबईसाठी निधी उपलब्ध होण्याबाबत चर्चा सुरू आहेत. तसेच भारतीय आयुर्विमा महामंडळासारख्या संस्थांबरोबर करार करून निधी उभारला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शंभर स्थानकांवर ‘वाय-फाय’
देशभरातील ४०० स्थानकांवर ‘वाय-फाय’ सेवा देण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात केली होती. मात्र ‘मेक इन इंडिया’ची घोषणा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या रेल्वे मंत्रालयाने वाय-फाय सुविधेचे काम गूगलसारख्या परदेशी कंपनीकडे सोपवले आहे. त्यानुसार आता गूगल ही जगप्रसिद्ध कंपनी रेलनेटच्या माध्यमातून ‘वाय-फाय’ सेवा पुरवणार आहे. या सेवेची सुरुवात शुक्रवारी मुंबई सेंट्रल स्थानकातून करण्यात आली. येत्या वर्षभरात देशातील १०० स्थानकांवर आणि २०१८ अखेरीपर्यंत ४०० स्थानकांवर ही सेवा गूगलद्वारे पुरवण्यात येणार आहे.