उपनगरी गाडय़ांमध्ये जागा अडवून भजन म्हणणाऱ्यांवर प्रवाशांच्या विरोधात रेल्वे पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे पोलिसांनी २२ जणांना ताब्यात घेतले. लोकल ट्रेनमध्ये काही प्रवास करून टाळ- मृदुंग वाजवून मोठमोठय़ाने भजन म्हणत असतात. त्यामुळे लोकल डब्यातील शांतता तर भंग होतेच शिवाय इतर प्रवासी विशेषत: आजारी, शाळकरी व वृद्ध प्रवाशांना त्रास होत असतो. याबाबतच्या तक्रारी रेल्वे पोलिसांकडे आल्या होत्या.  सोमवारी छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे पोलिसांनी तीन पथके तयार करून हार्बर मार्गावरून सुटणाऱ्या तिन्ही गाडय़ामंध्ये या भजनी प्रवाशांचा शोध सुरू केला होता. मस्जिद बंदर ते वडाळा दरम्यान शोध घेऊन या कारवाईत एकूण २२ जणांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम ११२/११७ प्रमाणे १२०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेले इसम नियमित प्रवास करणारे असून त्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. इतर प्रवाशांना भजन म्हणून उपद्रव करणाऱ्या प्रवाशांवर यापुढेही कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे यांनी सांगितले.  लोकलमध्ये भज करणाऱ्यांवर यापुढे अशीच कारवाई करण्यात येईल, असे रेल्वे पोलिसांनी या वेळी सांगितले.