मध्य व पश्चिम रेल्वेच्या मुख्य स्थानकांबाहेर फेरीवाल्यांचा तळ; पादचारी पूल आणि स्कायवॉकवरही अडथळा

उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासादरम्यान भयानक गर्दीचा अनुभव येत असताना तो प्रवास संपल्यानंतर स्थानकाबाहेर पडतानाही त्यांचा जीव मेटाकुटीला येत आहे. यासाठी प्रामुख्याने पश्चिम तसेच मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांबाहेरील फेरीवाले कारणीभूत आहेत. रेल्वेमार्गावरील जवळपास प्रत्येक स्थानकाच्या बाहेर फेरीवाल्यांचा वेढा पडला असून या फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना स्थानकात शिरताना त्रास होत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकातील पादचारी पूल आणि स्कायवॉक यांच्यावरही फेरीवाल्यांनी ठाण मांडले असल्याने गर्दीच्या वेळी प्रचंड चेंगराचेंगरी होते.

घाटकोपरच्या पूर्व व पश्चिम प्रवेशद्वारांमध्ये तसेच स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. घाटकोपर स्थानकाच्या पूर्वेस बाहेर पडल्यावर डावीकडे निलयोग स्क्वेअर चित्रपटगृह असल्याने येथे जाण्यासाठी अनेकांची गर्दी होत असते. मात्र, या गर्दीला वाट काढण्याआधी फेरीवाल्यांना सामोरे जावे लागते. अशीच फेरीवाल्यांची गर्दी पश्चिमेला मेट्रो स्थानकाखाली असून हा रस्ता अरुंद असल्याने येथे मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.

कुर्ला स्थानकालगत मोठय़ा प्रमाणावर फेरीवाल्यांनी गर्दी केली असून कुर्ला पूर्व ते पश्चिम जोडणारा रेल्वेचा पादचारी पूल हा पूर्णत फेरीवाल्यांनी व्यापून टाकला आहे. मोबाईल अ‍ॅक्सेसरीज ते गृहोपयोगी वस्तू येथे विक्रीला असून तब्बल ४० ते ५० फेरीवाल्यांनी हा पूल व्यापला आहे. अशीच परिस्थिती स्थानकाच्या पूर्व व पश्चिम भागात असून पूर्वेला बस स्थानक असून या परिसरात कपडे विक्रेते, सरबत विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. पश्चिमेला स्थानकाबाहेर पडतानाही प्रवाशांना फेरीवाल्यांमुळे अडचणींना तोंड द्यावे लागते.

वांद्रे पश्चिमेला फेरीवाले खूपच कमी आहेत. तसेच त्या फेरीवाल्यांचा अडथळा प्रवाशांना अजिबात होत नाही. हे फेरीवाले स्टेशन परिसराच्या बरेच बाहेर आहेत. पण वांद्रे स्थानकात रेल्वेच्या हद्दीतीली अनधिकृत बांधकामांची समस्या खूप मोठी आहे. तसेच वांद्रे पूर्वेकडे जाण्यासाठीच्या पादचारी पुलावर मोठय़ा प्रमाणात फेरीवाल्यांचे बस्तान असते. रेल्वे सुरक्षा दलाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. पूल स्त्यावर उतरण्याच्या ठिकाणीही फेरीवाले आणि रिक्षाचालक यांची झुंबड उडालेली असते.

अंधेरी स्थानकात पूर्वेकडील फेरीवाल्यांचा विळखा महापालिकेने मोडून काढला आहे. पण पश्चिमेकडे अद्यापही स्थानक इमारतीला लागून फेरीवाल्यांचे ठेले दिसतात. स्थानकात शिरण्यासाठीच्या ठिकाणी फेरीवाले सर्रास आपले स्टॉल टाकत असल्याने प्रवाशांना स्थानकात शिरताना खूपच कमी जागा उपलब्ध अस

दादर स्थानकात पूर्वेला फेरीवाले अजिबात नाहीत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. स्वामीनारायण मंदिराच्या बाजूला पोलीस बंदोबस्त असल्याने येथे फेरीवाले टिकत नाहीत. दादर पश्चिमेला मात्र फेरीवाल्यांनी पूर्वेचे उट्टे काढले आहे. फुलबाजार हा मुंबईतला एक प्राचीन बाजार असला, तरी त्याबाजूला हे फेरीवाले बस्तान मांडून बसतात. पश्चिमेला प्लॅटफॉर्मलगतचा सगळा रस्ता या फेरीवाल्यांनी व्यापला आहे. उड्डाणपुलाखाली प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी असलेली जागाही फेरीवालामय असते.पालिकेची गाडी एखाद वेळी येते. पण तेवढा वेळ फेरीवाले छबिलदासच्या गल्लीत किंवा टिळक पुलावर पलायन करतात.